गडचिरोली  : पोलीस शिपाई महिलेने विष घेऊन आत्महत्या केली आहे. प्रणाली काटकर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपाई महिलेचे नाव आहे. प्रणाली ही गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली पोलीस मुख्यालयात पोलीस  शिपाई या पदावर कार्यरत होती. ही घटना शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास गडचिरोली पोलीस वसाहतीत घडली. 


पोलीस कर्मचारी वसाहतीत प्रणाली पती पोलीस शिपाई संदीत पराते यांच्यासोबत राहात होती. दोन वर्षापूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. परंतु, पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडत असत. काल रात्री हा वाद विकोपाला गेला. त्यामुळे प्रणाली यांनी विष प्राषण केले. प्रणाली यांनी विष प्राषण केल्याचे समजताच संदीप पराते यांनी तत्काळ तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी प्रणाली यांना मृत घोषित केले.  


दरम्यान, या घटनेने पोलीस वसाहतीत एकच खळबळ उडाली असून प्रणाली यांच्या मृत्यूमुळे नातेवाईकांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. गडचिरोली पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.  


दरम्यान, हिंगोलीमध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. दिनेश बाळासाहेब मुलगीर असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. ते हिंगोलीच्या राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत होते. सध्या दिनेश हे गडचिरोली जिल्ह्यातील राजाराम खंडाला विभागामध्ये कर्तव्यावर होते.  दोन दिवसांत दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्तेसारखं टोकांचं पाऊल उचललं आहे.  


महत्वाच्या बातम्या