Maharashtra weather : सध्या राज्यात पावसानं (Rain) उघडीप दिली आहे. परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र, अद्यापही शेतकरी (Farmers) पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. शेती पिकांसाठी पावसाची गरज असतानाही पावसानं दडी मारली आहे. यावर्षी राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण, खान्देश तसेच नाशिक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील ढगाळ वातावरण राहून  तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.  


18 ऑक्टोबरपासून राज्यात उन्हाचा चटका


दरम्यान, पुढच्या तीन दिवसानंतर मात्र राज्यात उन्हाचा चटका वाढू शकतो. 18 ऑक्टोबरपासून पुन्हा राज्यात ढगाळ वातावरण निवळून ऑक्टोबर हिटचा परिणाम पूर्ववत जाणवू लागेल अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे. दरवर्षीपेक्षा यावर्षीची ऑक्टोबर हिट महाराष्ट्रात अधिक दाहक जाणवण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा दुपारचे कमाल तापमान 2 डिग्रीने तर पहाटेचे किमान तापमान 3 ते 4 डिग्रीने अधिक असण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मराठवाड्यात ऑक्टोबर हिटचा परिणाम अधिक असण्याची शक्यता देखील हवामान विभागानं वर्तवली आहे.


नैऋत्य मान्सून अद्यापही परतला नाही


9 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या रब्बीच्या तिसऱ्या आवर्तनात पावसाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, दक्षिण सातारा, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यापर्यंत साधारण जाणवू शकतो असा अंदाज माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय. नैऋत्य मान्सून अद्यापही महाराष्ट्रातील वेंगुर्ल्यापर्यंत खिळलेलाच आहे. देशातून पूर्णपणे परतलेला नसून त्याला निरोप देण्यासाठी अजुनही वाट पहावी लागेल, अशी माहिती खुळे यांनी सांगितली. ईशान्य मान्सून तामिळनाडूमध्ये कदाचित 25 ऑक्टोबर दरम्यान सेट होण्याची शक्यता जाणवत असल्याचे खुळे यांनी सांगितले. सध्या चक्रीवादळाचा काळ असल्याचेही खुळे म्हणाले.


देशातील विविध भागात पावसाचा अंदाज


उत्तरेकडे राजस्थानच्या वायव्य टोकावर स्थित पश्चिमी झंजावात आणि दक्षिणेत तामिळनाडू स्थित चक्रीय वाऱ्यांची स्थिती अश्या प्रणाल्यांच्या एकत्रित परिणामामुळं राज्यात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार राज्यात जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल. पेरणी केलेल्या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. पाऊस पडल्यास ही पिकं तग धरतील अन्यथा ही पिकं वाया जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील उत्तर प्रदेशात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे थंडीची लहर आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Sikkim Floods : सिक्कीममध्ये पुराचा तडाखा! 25000 लोक बाधित, 1200 घरे वाहून गेली, आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू