Samrudhhi Highway Accident : समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत. मध्यरात्री झालेल्या अपघाताने नाशिक जिल्ह्यातील अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून यात नाशिकमधील समतानगर देखील दुःखात बुडालं आहे. येथील सोळसे कुटुंबातील मायलेकींचा करुण अंत झाला असून वडिलांसह दोन लहान लहान चिमुरडे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र दुर्दैवी घटनेने समतानगर परिसरावरच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


समृध्दी महामार्गावर जांबरगाव टोलनाक्याजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर पंधरा जण जखमी झाले. नाशिक शहरातील समतानगर परिसरात राहणाऱ्या सोळसे कुटुंबातील लखन सोळसे हे आपली पत्नी काजल, पाच वर्षांची मुलगी तनुश्री आणि दोन मुलांसह शुक्रवारी सायंकाळी बुलढाण्याजवळील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, तिथून परतत असतानाच पत्नी काजल आणि 5 वर्षांची मुलगी तनुश्रीवर काळाने घाला घातला. या दोघींचे मृतदेह दुपारी समता नगरला घरी आणण्यात येताच नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळाला. सोळसे कुटुंबावरच नाही तर या संपूर्ण परिसरावरच दुःखाचा डोंगर कोसळला असून आज या परिसरातील कोणत्याच घरी चूल पेटलेली नाही. 


दरम्यान समतानगर परिसरात राहणारे सोळसे कुटुंबीय अनेक दिवसानंतर बुलढाण्यात असलेल्या सैलानी बाबांच्या दर्शनासाठी गेले होते. लखन शंकर सोळसे त्यांची पत्नी काजल, छोटी मुलगी तनुश्री, मुलगा कार्तिक आणि मोठी मुलगी धनश्री हे सर्वजण गेले होते. दर्शनानंतर बुलढाण्याहून थेट वैजापूर मार्गे नाशिक जाणाऱ्या टेम्पो टॅव्हलरने घरी परतत होते. ट्रँव्हलर समृद्धी महामार्गावर असताना ट्रँव्हलरच्या पुढे एक ट्रक चालत होता. मात्र, जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रकला अचानकपणे एका आरटीओच्या पथकाने हात दाखवत थांबण्याचा इशारा केला आणि ट्रक चालकाने जागेवरच ब्रेक मारला. त्यामुळे मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बस चालकाला काही कळण्याच्या आता भरधाव वेगाने येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॅव्हल्स बसच्या पुढच्या भागाचा अक्षरशः चुराडा झाला. काही कळायच्या आता 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. यात सोळसे कुटुंबातील मायलेकींचा देखील शेवटचा प्रवास ठरला. 


समतानगर दुःखात बुडालं!


दरम्यान नाशिक शहरातील समतानगर भागात राहणारे सोळसे कुटुंबीयांची हलाखीची परिस्थिती असून लखन सोळसे हे एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करतात. मात्र या अपघाताने सर्वच हिरावून घेतले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हंबरडा फोडला. आज दुपारच्या सुमारास काजल आणि मुलगी तनुश्रीचा मृतदेह समतानगरमध्ये आणण्यात आला. लखन शंकर सोळसे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मुलगा कार्तिक आणि मुलगी धनश्री लखन सोळसे हे देखील जखमी असून त्यांच्यावर वैजापूर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


इतर महत्वाची बातमी : 


Samriddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातात 12 जणांचा मृत्यू, 23 जखमी; अपघातातील जखमी आणि मृतांची यादी