Maharashtra Weather News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
'या' भागात पडणार मुसळधार पाऊस
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज संपूर्ण कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच मुंबईसह ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये पावासचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरबोर आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं आज कोकणसह मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस, शेती पिकांना फटका
काल मध्यरात्रीपासून बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तर आज सकाळी पाच वाजल्यानंतर शेगाव परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला आहे. यामुळे अनेकांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मुसळधार पडलेल्या पावसाने नुकत्याच पेरणी केलेल्या पिकांना मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा मध्ये भोगावती नदीला पूर, घरामध्ये शिरलं पाणी
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात संध्याकाळी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं भोगावती नदीला मोठा पूर आल्याने नदी काठावरील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. चैनी रोड परिसरातील गोविंद नगर येथील संघम डेअरीच्या गल्लीत काही घरांमध्ये पाणी शिरलं आहे. तर वरवाडे भागातील हात गाड्या, टपऱ्या आणि दोन मोटारसायकली वाहून गेल्याची घटना देखील डली आहे. तसेच अमरावती नदीलाही पूर आला आहे. नदीच्या पुरामुळं काही नागरिकांचा संपर्क देखील तुटला आहे. अनेक वर्षानंतर एवढा मोठा पूर आल्याने नागरिकांनी पूर बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
Heavy Rain : मुसळधार पावसाची दाणादाण! अमरावतीत ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकर्यांवर दुबार पेरणीचे संकट