पुणे : आयएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. रुजू होण्याआधीच स्वत:च्या ऑडी कारला अंबर दिवा लावल्यामुळे मोठा बोभाटा झाला. चमकोगिरीच्या नादात पूजा खेडकरांची इतर कारनामे बाहेर आली. पूजा खेडकरांनी यूपीएससीला वैद्यकीय प्रमाणपत्र देताना घपला केल्याचा आरोप आहे. हा सगळा प्रकार एबीपी माझाने उघडकीस आणल्यावर पूजा खेडकरांवर आता मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांनी यूपीएसससीच्या परीक्षा प्रक्रियेत सादर केलेली कागदपत्रं आणि वैदकीय प्रमाणपत्र ही खोटी आणि चुकीची असल्याचे आरोप झाले होते. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर अखेर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आणण्यात आला असून त्यांना मसुरी प्रशिक्षण संस्थेत परत बोलवण्यात आलं आहे.
पूजा खेडकर प्रकरणाची क्रोनोलॉजी (IAS Pooja Khedkar Case Chronology)
9 जुलै - एबीपी माझाने पूजा खेडकर यांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर आणलं. पुजा खेडकर यांना DOPT ने वारंवार बोलावून देखील त्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी न गेल्याने कॅटने त्यांच्या विरोधात निर्णय दिला. असं असतानादेखील त्या आयएएस म्हणून निवडल्या गेल्याने संशय बळावला.
10 जुलै - पुजा खेडकर यांनी दिव्यंगांसाठीच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी त्यांना मल्टीपल डिसेबीलीटी असल्याचं सांगत सर्टिफिकेट मिळवलं होतं. पूजा खेडकर यांच्याकडे दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट असल्याचं एबीपी माझाने समोर आणलं.
11 जुलै - पुजा खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट मिळवले. त्यांचे आणि त्यांच्या पालकांचे उत्पन्न लपवल्याचे एबीपी माझाने समोर आणलं.
12 जुलै - खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी पिस्तूलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचे एबीपी माझाने समोर आणलं. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
13 जुलै - पुजा खेडकर यांनी अंबर दिवा वापरताना नियमांचा भंग झाल्याचं स्पष्ट झाले आणि पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली.
14 जुलै- पुजा खेडकर यांची ऑडी कार पोलीसांनी जप्त केली. त्याचबरोबर पुजा खेडकर यांचे आई-वडील गायब झाल्याचं स्पष्ट झालं.
16 जुलै - पुजा खेडकर यांनी ज्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेतली होती त्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेताना त्यांचे नाव वेगळे असल्याचं समोर आलं. त्याचबरोबर वडील क्लास वन अधिकारी असताना देखील त्यांनी ओबीसींसाठीच्या कोट्यातून नॉन क्रिमीलयर सर्टिफिकेट सादर करून प्रवेश घेतल्याच स्पष्ट झाले. यातुन 2018 ला आधीच्या खेडकर पुजा दिलीप या रेकॉर्डवरुन अंतर्धान पावल्याचं आणि तिथून पुढे नव्या नावाने पुजा मनोरमा दिलीप खेडकर एक वेगळीच व्यक्ती म्हणून अस्तित्वात आल्याचं स्पष्ट झाले.
16 जुलै - DOPT ने पूजा खेडकरांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला स्थगिती दिली असून त्यांना मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्याचा निर्णय घेतला.
खरंतर, अनेक विद्यार्थी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचं स्वप्न पाहतात. त्यासाठी रात्रीचा दिवस एक करत प्रचंड अभ्यास करतात आणि यश मिळवतात. मात्र पूजा खेडकरसारख्या प्रकरणांमुळे त्यांची उमेद कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महत्त्वाचं म्हणजे यूपीएससीच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं. म्हणूनच हे टाळण्यासाठी पूजा खेडकर दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी.
ही बातमी वाचा: