पुणे : ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली आहे. राज्यात या वर्षी मान्सून सुरुवातीला 4 दिवस उशिरा दाखल झाला. त्यानंतर आलेल्या चक्रीवादळामुळे कोकणात आलेल्या पावसाची गती थांबली आणि राज्यात 23 जूननंतर पावसाला पुन्हा चालना मिळाली. जुलैमध्ये चांगला पाऊस असला तरीही ऑगस्टमध्ये मात्र हवा तसा पाऊस दिसत नाहीय. आता मान्सून कधी परतणार, अशा चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. मान्सून आतापासून परतीच्या वाटेवर असेल तर, राज्यात काय परिस्थिती बघायला मिळेल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


सध्या राज्यात मान्सूनची काय परिस्थिती? 


ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस बघायला मिळणार आहे. तसेच, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील परिस्थिती तशीच राहणार आहे. मात्र, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 8 सप्टेंबरपासून 21 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस बघायला मिळू शकतो. 


मान्सून परतणार कधी? 


ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस पडत नसल्यानं नागरिकांची आणि शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मान्सून परतीच्या वाटेवर असेल तर, शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होणार का, असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. मात्र, हवामान खात्याने परतीच्या पावसाबाबत कुठलाही अंदाज वर्तवलेला नाही. "सध्याची परिस्थिती बघता परतीच्या पावसाबद्दल आम्ही कुठलाही अंदाज बांधलेला नाही. परतीच्या पावसाची सुरुवात ही सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होते. मात्र, सध्या तरी परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण नाही. सप्टेंबर महिन्यात येणारा पाऊस हा शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकेल", असं हवामान खात्याचे प्रमुख के.एस. होसळीकर यांनी सांगितलं आहे.


हवामान खात्याचे नकाशे कसे समजून घ्यायचे? 


उष्ण आणि शीत रंग आपल्याला हवामान खात्याने प्रसारित केलेल्या नकाशांमध्ये बघायला मिळतात. या रंगांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं आहे. उष्ण रंग म्हणजे लालपासून पिवळ्या रंगांपर्यंत हे सरासरी पेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचं सांगतात. तर, शीत रंग म्हणजे निळा किंवा गडद निळा रंग हे सरासरी पेक्षा अधिक पाऊस पडेल, अशी शक्यता दर्शवतात. तर, पांढऱ्या रंगाचे तीन अर्थ असू शकतात. पांढरा रंग म्हणजे सरासरी इतका पाऊस पडेल, सरासरी पेक्षा अधिक किंवा कमी पाऊस पडेल किंवा जिथे अंदाज वर्तवता येत नाही तिथे पांढरा रंग दिला जातो.