Jalna News : बदली रद्द झाल्याने डीजेच्या तालावर वाचत गाजत मिरवणूक काढणाऱ्या जालना (Jalna) येथील महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला महावितरणनेच शॉक दिलाय. बेशिस्त वर्तवणूक आणि कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी महावितरणने या अधिकाऱ्याचे निलंबन केले आहे. त्यामुळे जबाबदार पदावर असलेल्या या अभियंत्याच्या असुरी आनंदाला ग्रहण लागले आहे. प्रकाश चव्हाण असे अभियंत्याचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर पोलिसांनी देखील यापूर्वीच गुन्हा दाखल केलेला आहे. 


जालना येथे महावितरणच्या विभाग क्रमांक एक मधील ग्रामीण उपविभागात कार्यरत असलेले सहाय्यक अभियंते प्रकाश चव्हाण यांची काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे बदली झाली होती. मात्र, महिनाभरात त्यांची बदली पुन्हा मूळ ठिकाणी जालना येथे झाली. त्यामुळे बदलीचे आदेश हातात पडताच साहेब अभियंते आणि त्यांच्या समर्थक गुत्तेदारांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यामुळे त्यांनी शहरातील भर चौकात असा जल्लोष सुरु केला. विशेष म्हणजे, यासाठी डीजे लावण्यात आला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. ज्याप्रमाणे एखांद्या आमदार खासदाराच्या विजयाची मिरवणूक निघते, त्याप्रमाणे चव्हाण यांच्या बदलीच्या आनंदात मिरवणूक निघाली होती. 


दरम्यान, सहायक अभियंते प्रकाश चव्हाण आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केलेल्या जल्लोषपूर्ण महान कार्याची पोलिसांनी देखील तात्काळ दखल घेतली. विनापरवाना डीजे लावून भर चौकात बेकायदेशीर गर्दी जमावत मंडप लावल्या प्रकरणी प्रकाश चव्हाण यांच्यासह 20 ते 30 कार्यकर्त्यांवरती सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 


प्रशासकीय कारणास्तव झाली होती बदली...


विशेष म्हणजे, सूत्रांच्या माहितीनुसार या सहायक अभियंत्यांच्या विरोधात यापूर्वी काही तक्रारी होत्या. दरम्यान, प्रशासकीय कारणास्तव त्यांची 14 जुलै रोजी रत्नागिरी येथे बदली करण्यात आली होती. मात्र अवघ्या महिनाभरात 18 ऑगस्ट रोजी त्यांची पुन्हा जालना ग्रामीण उप विभागामध्ये बदली करण्यात आली. याच बदलीचे आदेश हातात पडतात समर्थक तथाकथित गुत्तेदारांनी या शाही मिरवणुकीचे आयोजन केलं होते. 


कारवाईनंतरही काही प्रश्न अनुउत्तरीत


या सर्व प्रकारानंतर कारवाई तर झाली. मात्र, अजूनही काही प्रश्न अनुउत्तरीत आहे. प्रशासकीय कारणास्तव झालेली बदली एकाच महिन्यात पुन्हा मूळ ठिकाणी कशी झाली?, या साठी कोणते महत्वाचे कारण होते?, जल्लोष करणारे कथित गुत्तेदार कोण?, त्यांच्या या आनंदाचे जल्लोषाचे कारण काय?, या सर्व अर्थपूर्ण कारणांच उत्तर अद्याप मिळाले नाही हे विशेष आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


हायटेक चोरी! बारावी पास चोर अवघ्या तीन मिनिटात कार लांबवतो, पोलिसांनीही मारला डोक्याला हात