El Nino : आगामी काळात महाराष्ट्रात दुष्काळाचं (Maharashtra Drought) संकट येण्याची शक्यता आहे. याच कारण म्हणजे यंदा एल निनोचा (El Nino) प्रभाव जाणवणार आहे. याचा परिणाम मान्सूनवर (Monsoon) होण्याचं भाकीत अमेरिकेच्या हवामान अभ्यासक संस्था नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशननं ( National Oceanic and Atmospheric Administration) केलं आहे. त्यामुळं उन्हाळा संपताना दुष्काळासह अनेक संकट देखील ओढावू शकतात.


जून ते डिसेंबर दरम्यान 55 ते 60 टक्के एल निनोच्या प्रभावाची शक्यता


आधी पाऊस त्यानंतर अवकाळी आणि भविष्यात कदाचीत महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट येण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे एल निनोचा परिणाम. याचा परिणाम मान्सूनवर होण्याचं भाकित अमेरिकेच्या हवामान संस्थेनं केलं आहे. अमिरीकेच्या संस्थेनं वर्तवलेल्या अंदाजावर भारतीय हवामान विभागानं मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. जून ते डिसेंबर दरम्यान, 55 ते 60 टक्के एल निनोच्या प्रभावाची शक्यता आहे. हिंदी महासागराच्या तापमानातील तफावत दाखवणारा हा घटक आहे. जानेवारी आणि फेर्बुवारी महिन्याच्या डेटाच्या आधारे एल निनोच्या प्रभावबद्दल अमेरिकेच्या संस्थेनं अंदाज वर्तवला असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनिल कांबळे यांनी दिली. त्यामुळं आपण एप्रिलपर्यंत वाट पाहू. ज्यावेळेस भारतीय हवामान विभाग आपला अंदाज वर्तवेल त्यावेळी जर एल निनो असेल तर त्याची माहिती दिली जाईल असे  कांबळे  म्हणाले. 


अरबी समुद्राचे तापमान जर मान्सून काळात जास्त असेल तर त्याला पॉझिटीव्ह आयओडी असं म्हटलं जातं आणि बंगालच्या उपसागरात तापमान जास्त असेल तर त्याला निगेटीव्ह आयओडी असं म्हटलं जातं. पॉझिटीव्ह आयओडी ज्यावर्षी असेल त्यावेळी मान्सून काळात चांगला पाऊस होत असतो. यंदा जुलैपासून पॉझिटीव्ह आयओडीचे संकेत मिळत असल्याची माहिती  तसे झाले तर मान्सूनच्या दृष्टीनं चांगली बाब असल्याची माहिती हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिली आहे. 


एल निनो म्हणजे काय? 


अतिउष्णतेमुळे दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीलगत पाणी तापतं. यामुळं समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान देखील वाढते. त्याचा परिणाम म्हणजे प्रशांत महासागरात कमी दाबाचा पट्टा तयार होतो. यामुळं हिंद महासागरात थंड वाऱ्याची दिशा बदलते. हेच वारे दक्षिण अमेरिकेकडे वळल्यामुळं भारतात पाऊसमान कमी होतं. एल निनोचा प्रभाव दर तीन ते सात वर्षांनी आढळतो. एल निनोमुळं मान्सूनच नाही तर
हिवाळा देखील उबदार होतो. तसेच उन्हाळा देखील आणखी गरम होतो.


याआधी दुष्काळ एल निनोमुळेच


एका अहवालानुसार भारतानं 2002, 2004, 2009 आणि 2012 या वीस वर्षांत जे काही दुष्काळ पाहिले
ते एल निनोमुळेच आले. त्यामुळं पावसावर अवलंबून असणाऱ्या खरीप आणि रबी पिकांच्या उत्पादनात
घट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आत्ताच सावध होऊन सरकारनं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.


पाऊस कमी पडला तर उपाययोजना करणार


दरम्यान, याबाबत विधीमंडळात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर यावर्षी कमी पाऊस पडला तर काय उपाययोजना करायच्या यासंदर्भात मुख्य सचिवांना बैठक घ्यायला सांगितली आहे. त्याचा एक प्लॅन तयार करत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget 2023: मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद; फडणवीसांची घोषणा