Wardha Water Crisis : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट (Water Crisis) अधिक गडद झाल्याने नागरिकांना मे महिन्याच्या सुरवातीलाच पाण्यासाठी मोठी वनवण करावी लागत आहे.अनेक ठिकाणी पाण्यासाठी डोक्यावर हंडे, घागरी घेऊन कित्येक मैलांची पायपीट करावी लागतेय. तर काही ठिकाणी पाण्यासाठी टँकरचाच आसरा उरला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील पाणीसाठा (Water storage) हा अवघ्या 28 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. दुष्काळाचं असेच भीषण सावट विदर्भातील अनेक जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात देखील बघायला मिळत आहे. 


विहिरीतून पाणी ओढताना कित्येक पिढ्यांच्या हातावरील रेषा धुसर


वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहिद तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात गेल्या पन्नास वर्षापासून गावतील तलावाची मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या या गावात पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत आहे. त्यामुळे गावातील महिला, पुरुष, चिमुकल्यांची पावले गावाबाहेर असलेल्या विहिरीतून पाणी भरण्यासाठी वळले आहे. गावात योजना असली तरी नळ पाण्याअभावी कोरडेच आहे. विहिरीतील पाण्यानेही हल्ली तळ गाठण्यास सुरवात केली असून विहरीतील पाणी ओढून दोरखंडाने पिढ्यांच्या हाताच्या रेषा धुसर होत आहेत. पण, पाण्याची समस्या मात्र आद्यप मिटलेली नाही.


हांडाभर पाण्यासाठी गावकऱ्यांची मोठी पायपीट 


आष्टी तालुक्यातील बोरखेडी, बांबर्डा गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन आहे. माळरान भागात वसलेल्या गाव परिसरात अनेक दशकांपासून पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. तसे तर जानेवारी महिन्यापासूनच येथील विहिरींची पाणी पातळी खालावते. एप्रिल, मे महिन्यासोबत पाऊस येईस्तोवर परिस्थिती अधिकच बिकट असते. पाण्यासाठी गावालगतच्या विहिरीवर जावे लागते. ज्यांच्याकडे बैलगाडी आहे ते ड्रमने दुर अंतरावर असलेल्या शेतातील विहिरीतून पाणी आणतात. एखादवेळी टँकर बोलाविला जातो. तर दुसरीकडे हांडाभर पाण्यासाठी महिला, पुरुष, आणि चिमुकल्यांचीही पाण्यासाठी पायपीट होते आहे. बरेचदा रात्रीही टॉर्च लावून पाण्याकरिता जावे लागत असल्याचे अनुभव गावकरी सांगतात. 


'हर घर नल पण, नळात नाही जल'


गावात पाणी पुरवठा योजना आहे. येथे माळेगाव येथील तलावातून पाणी पुरवठा होतो. पण, तलावातील पाणीही अखेरच्या टप्प्यात  आहे. त्यामुळे घरोघरी नळ दिसत असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी वास्तविकता मात्र वेगळीच दिसते. जिथे माणसाला पाण्यासाठी पायपीट करावी लागते तेथे जनावरांनाही पाणीटंचाईचा फटका बसतोय. अनेक पशुपालक जनावरांसह उन्हाळ्याच्या कालावधीत इतरत्र स्थलांतर करत असल्याचे सांगण्यात आलंय. गावात पाण्याची समस्या असल्याने आणि पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचा परिणाम लग्नावर होत असल्याचे नागरिक सांगतात. 


गावासाठी तलाव हाच योग्य पर्याय 


पाण्यासाठी कष्ट करावे लागत असल्याने येथे सोयरिक करण्यासाठी पाणीटंचाई अडसर ठरत असल्याचे गावकरी सांगतात. येथीलच महादेव तायवाडे या गृहस्थाने गेल्या साठ वर्षापासून गावात तलाव व्हावा यासाठी पाठपुरावा केलाय. मात्र ही मागणी अद्याप पूर्ण झालेले नाही. गावासाठी तलाव हाच पर्याय योग्य आहे. तलाव झाला तर परिसरातील  बांबर्डा, बोरखेडी, थार, चामला, बोटोणा, किन्ही, मुबारकपूर, मोई  अशा अनेक गावाचा पाणी प्रश्न मिटेल आणि तहानलेल्या गावाला पाणी मिळेल. अशी अपेक्षा गावकऱ्यांनी बोलतांना व्यक्त केलीय.  


इतर महत्वाच्या बातम्या