Rupali Chakankar on Supriya Sule : सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे. त्यांनी 2 कोटी 40  लाख महिलांची माफी मागावी असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी केलं. बदला घ्यायचा असेल तर, तुतारीच्या उमेदवाराला मतदान करु नका असेही चाकणकर म्हणाल्या. 


लाडकी बहिण योजनेला सुप्रिया सुळेंचा विरोध 


वित्तमंत्री म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना आणून त्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आर्थिक सक्षम करण्यासाठी पाठबळ दिलं आहे. ही योजना यशस्वी झाली आहे. राजकीय इतिहासातील ही पहिली योजना आहे जी, थेट सरकारमधून थेट महिलांच्या खात्यात पैसे जमा होतात. ही योजना वाड्या, वस्ती आणि पाड्यावर राहणाऱ्या ज्या महिलांचं आर्थिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी लाभदायी ठरली आहे. ही योजना अक्षरश: महिला भगिनींनी डोक्यावर घेतली आहे. हेच दुखणं विरोधकांमध्ये निर्माण झालं आहे. त्यामुळं पहिल्या दिवसापासून सुप्रिया सुळे या योजनेला विरोध करतायत. स्त्री असताना त्यांनी या योजनेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे गरजेचे असताना ही योजना फसवी योजना आहे, म्हणून त्या सांगत राहिल्याचे चाकणकर म्हणाल्या. 


सुप्रिया सुळेंनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली


लाडकी बहीण योजना ही निवडणुकीचा जुमला असल्याचे सुप्रिया सुळे सांगत राहिल्याचे चाकणकर म्हणाल्या. पैसे जमा झाल्यानंतर पैसे सरकार काढून घेतील अशीही वल्गना त्या करत आहेत. याही पुढे जाऊन त्या हायकोर्टात गेल्या. मात्र, कोर्टानंही त्यांना फेटाळलं. आता त्या सांगत आहेत की, 1500 रुपयांमध्ये महिलांना विकत घेता येत नाही. त्यांनी जवळजवळ 2 कोटी 40 लाख महिलांना या योजनेचा लाभ झालेला आहे. त्यामुळं सुप्रिया सुळेंनी महिलांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवलेली असल्याचे चाकणकर म्हणाले. त्यांनी  महिलांचा अपमान केला असल्याचे चाकणकर म्हणाल्या. 


 सुप्रिया सुळेंनी 2 कोटी 40 लाख महिलांची माफी मागावी


काल महाविकास आघाडीने जेव्हा पंचसूत्री मांडली, त्यात महिलांना 3000  रुपये देण्याचे सांगितलं आहे. ते आता कोणत्या निकषवर देणार आणि 1500 दिल्यावर राज्य कर्जबाजारी होणार, असंही त्या म्हणत होत्या. त्यामुळं आता 3000 दिल्यांवर राज्य कसं चालणार?  याचंही उत्तर सुप्रिया सुळे यांनी दिलं पाहिजे. 2 कोटी 40 लाख महिलांची त्यांनी माफी मागावी. अन्यथा महिला भगिनींनी आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल तर, ज्या ज्या ठिकाणी तुतारीचा उमेदवार उभा असेल तिथे त्याला मतदान नं करणं, हाच अपमानाचा बदला घेण्याचा उपाय असल्याची टीका रुपाली चाकणकर यांनी केली. 


महत्वाच्या बातम्या:


चाकणकर मला बाहेरची म्हणत असेल तर बाहेरुन लढते ना; रुपाली ठोंबरे चांगलंच संतापल्या