Maharashtra Unseasonal Rain: मॉन्सून अंदमान बेटांपर्यंत दाखल झाला असून त्याची आगोकूच सुरू आहे. तसेच, पुढच्या आठवड्याभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. अशात राज्यात मात्र अवकाळीनं हैदोस घातला आहे. राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मुंबईत देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस कोसळत आहे. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अनेक भागांत तर अवकाळीनं बळीराजा पार बेजार झाला असून हातातोडांशी आलेला घास हिरावून घेतला आहे.
अवकाळी पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली; शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान (Bhandara Unseasonal Rain Updates)
Bhandara Unseasonal Rain: उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसानं मात्र उसंत घेतली नसल्याचं चित्र सध्या संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. काल (रविवारी) दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं. त्यातच मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापणीला आलेलं धान या गारपिटमुळे अक्षरशः धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेतीही नष्ट झाली आहे. शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडून पडल्यानं काही ठिकाणी वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. तर, अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झाल्याचंही पाहायला मिळत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं शेतकरी हवालदिल; नवापुरात सकल भागात साचलं पाणी, पालिकेचं मात्र दुर्लक्ष (Nandurbar Unseasonal Rain Updates)
Nandurbar Unseasonal Rain: नंदुरबारमधील नवापूर शहरातील गढी परिसरात सकल भागांत पाणी साचल्यानं दुकान व्यवसायकांचे मोठे हाल झाले आहेत. यासंदर्भात परिसरातील व्यवसायिकांनी नगरपालिकेला वारंवार निवेदन देऊन देखील उपाययोजना न झाल्यानं व्यवसायिकांनी संताप व्यक्त केला आहे. अवकाळी पावसात अशी परिस्थिती आहे, तर पावसाळा सुरू झाल्यावर आमच्या दुकानात पाणी शिरतं की काय? अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात नगरपालिका प्रशासनानं ठोस उपाय योजना करावी, अशी मागणी व्यवसायिकांनी केली आहे. नवापूर शहरातील बस स्टँड परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचलेली दिसून आली आहेत. आदर्श नगर भागात रस्ते तयार न केल्यानं पाण्याची डबकी साचत असल्यानं नागरिक संतप्त झाले आहेत. पालिका प्रशासन या भागांत कधी रस्ते तयार करून नागरिकांना सुविधा कधी देते अजून तरी निश्चित नाही.
वादळी वाऱ्यानं आमगाव रेल्वे स्थानकावरील टिनाचे शेड उडाले (Gondia Unseasonal Rain Updates)
Gondia Unseasonal Rain: गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक भागांमध्ये अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं अक्षरशः थैमान मांडला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांतील घरांवरील छत उडून गेलं आहे. आमगाव रेल्वे स्थानकाला देखील या वादळी वाऱ्याचा फटका बसला आहे. चक्क रेल्वे स्थानकावरील लोखंडी टिनचे शेड उडालं आहे. त्यातील काही टिन हे वीज वाहिन्यांमध्ये अडकल्याचं दिसत आहे.
वादळी वाऱ्यामुळे झाडं कोलडमली, तर झाडं वाहनांवर पडल्यानं वाहनांचं नुकसान (Hingoli Unseasonal Rain Updates)
Hingoli Unseasonal Rain: हिंगोली शहरामध्ये आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार स्वरूपात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावल्यामुळे हिंगोली शहरातील अनेक झाडं कोलमडून पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे कोलमडलेली अनेक झाडं उभी असलेल्या चारचाकी वाहनांवर पडल्यामुळे वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जोरदार स्वरूपाच्या या पावसामुळे शेतातील भाजीपाला, पिकं त्याचबरोबर फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.