Maharashtra Unseasonal Rain : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात काही ठिकाणी पहाटेपासूनच हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी पहाटे रिमझिम पाऊस झाला आहे. राज्यात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्यावर्षी नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2021 वर्ष संपता संपता अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अशातच आता पुन्हा एकदा 2022 सालच्या सुरुवातीला देखील असंच काहीसं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. एकामागोमाग एक पश्चिमी चक्रावात येत असल्याने राज्याला पुन्हा एकदा अवकाळीला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान पावसाळी वातावरण बघायला मिळू शकते.
संबंधित बातम्या :
- Coronavirus Maharashtra : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा शिवसेना महापौरांनाच विसर
- Maharashtra Corona Update : राज्यात शुक्रवारी तब्बल 40 हजार 925 रुग्णांची नोंद, ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही
- लांबसडक केस हवेत? तर कमी पैशांमध्ये घरच्या घरी हे उपाय करुन बघाच...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha