रत्नागिरी : फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला एखाद्या अलिशान हॉटेलची आठवण झाली असेल नाही का? तर थोडं थांबा! तुम्ही थोडी घाई करताय. हे अलिशान हॉटेल नसून कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅन आहे. अगदी दोन शब्दात सांगायचं झालं तर चालतं - फिरतं हॉटेल!


कॅराव्हॅन ही यापूर्वी केवळ युरोपीयन देशांमध्येच होती. पण, विद्यमान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत पुढाकार घेतला. त्यानंतर ही व्हॅन पर्यटकांच्या सेवेत दाखल झाली आहे. 2018 मध्ये याबाबत पावलं उचलली गेली आणि 2020 मध्ये ही व्हॅन सध्या रस्त्यावर धावतेय. ही व्हॅन रस्त्यावर धावण्याचा पहिला मान महाराष्ट्राला मिळाला आहे. याला Recreational Vehicle असं देखील म्हणतात.

कॅरव्हॅन म्हणजे काय? सुविधा काय असणार?

कॅरव्हॅन म्हणजे चालतं-फिरतं  हॉटेल.या व्हॅनमध्ये पर्यटन निवास तसेच एखाद्या हॉटेलमध्ये  मिळणाऱ्या सुविधा या ठिकाणी मिळणार आहेत. सर्व सोयी-सुविधांनी युक्त अशी ही व्हॅन आहे. युरोपीय देशांमध्ये शहरात बंगले असणाऱ्यांनी किंवा डोंगराळ, दुर्गम भागातील रहिवाशांनी आपल्या जागेत कॅराव्हॅन उपलब्ध करून दिली आहे. या व्हॅनमध्ये टेबल, खुर्ची, छोटे स्वयंपाकघर, टीव्ही, इलेक्ट्रीसीटी, फ्रीज, टॉयलेट, बेड्स अशा सुविधा उपलब्ध आहेत.

सध्या दोनच व्हॅन रस्त्यावर धावत असून 12 मीटर लांबीची कॅराव्हॅन तर छोटी कारच्या आकाराची कॅम्परव्हॅन आहे. कॅराव्हॅन तयार करण्यासाठी दोन वर्षे आणि अडीच कोटींचा खर्च आला. महत्त्वाची बाब म्हणजे ही व्हॅन एका मराठी माणसानं तयार केली आहे. त्याचं नाव सचिन पांचाळ असं असून त्याचं मुळगाव कोकणातील कणकवली तालुक्यामध्ये आहे.


कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनमध्ये फरक काय?

कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनमध्ये फरक देखील आहे बरं का? कॅराव्हॅन ही 12 मीटर लांब इतकी असून त्यामध्ये तुम्हाला अगदी किचनपासून  टॉयलेटपर्यतच्या सुविधा आहेत. पण  कॅम्परव्हॅन ही कारएवढी असून त्यामध्ये तुम्हाला टॉयलेट, बाथरूमची सोय नाही आहे.

कॅराव्हॅन आणि कॅम्परव्हॅनचं भाडं किती?

कॅराव्हॅनचं एका दिवसाचं भाडं 21 हजार रूपये प्रति दिवस असून यामध्ये तुम्हाला खाण्याकरता लागणारे काही ठराविक अन्नपदार्थ दिले जातात. सोबत एक क्लिनर आणि ड्रायव्हर दिला जातो. यामधून सहा प्रवासी मस्त प्रवास करू शकतात. तर, कॅम्परव्हॅन तुम्हाला स्वत:लाच ड्राईव्ह करावी लागते. याकरता 4 हजार रूपये प्रति दिवस इतकं भाडं आहे. यातून 3 ते चार जणांना प्रवास करता येतो.

कॅराव्हॅनंनं मुंबईहून सहा प्रवासी कोकणात आले, त्यांचा यावेळचा अनुभव देखील मस्त आहे. मोटो होम आणि एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या 1 मोठी आणि 1 मिनी कॅराव्हॅन धावत आहे. पर्यटनाकरता कॅराव्हॅन उपलब्ध करून देणारं देशातील महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. पर्यटकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरता एमटीडीसीसोबत टायअप करण्यात आलं आहे.

राज्यात निसर्गरम्य समुद्र किनारे, ऐतिहासिक किल्ले, थंड हवेची ठिकाणं आहेत. पैकी अनेक ठिकाणी हॉटेल किंवा निवासाची सोय कमी प्रमाणात उपलब्ध आहे. अशा ठिकाणी कॅराव्हॅन किंवा कॅम्परव्हॅनच्या साहाय्याने पर्यटकांना निवासासहित इतर सर्व सोयीसुविधा MTDCकडून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  ही बाब डोळ्यासमोर ठेवून कॅराव्हॅन पर्यटन धोरण तयार करण्यात आले आहे.

त्यामुळे आता हॉटेल किंवा राहण्याची सोय नसलेल्या ठिकाणी जाताना पर्यटकांना कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला तर का या व्हॅननं प्रवास करत लक्झरीअस प्रवासाचा अनुभव घ्यायचा असेल तर, www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर जात नोंदणी करता येणार आहे.