बीड : ऊसतोड कामगारांना 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळायला पाहिजे आणि तूर्त ऊसतोड कामगार हे कामावरती जातील अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी जाहीर केल्यानंतर भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी मात्र या भूमिकेला विरोध दर्शवलाय जोपर्यंत ऊसतोड कामगारांना दीडशे टक्के मजुरीत वाढ मिळत नाही तोपर्यंत कोणीही ऊस तोडायला जाणार नाही अशी भूमिका आता सुरेश धस यांनी घेतली आहे.


ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करावी म्हणून कामगार संपा वरती आहेत मात्र जर 21 रुपयांच्या पुढे दरवाढ मिळाली तर कामगारांनी ऊसतोडीसाठी निघायला हरकत नाही अशी भूमिका पंकजा मुंडे यांनी अंबाजोगाईमध्ये झालेल्या जाहीर सत्काराच्या कार्यक्रमात व्यक्त केली. मात्र त्यांच्या या भूमिकेनंतर सुरेश धस यांनी मात्र अकरा ऊसतोड कामगारांच्या संघटनाचा संप चालूच राहील जोपर्यंत दीडशे टक्के भाववाढ मिळणार नाही. तोपर्यंत कोणीही ऊसतोड कामगार कारखान्यावर जाणार नाही अशी भूमिका घेऊन पंकजा मुंडे यांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.


याच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात उद्या भगवान गडाच्या पायथ्याशी वंचित बहुजन आघाडी कडून ऊसतोड कामगारांचा मेळावा ठेवण्यात आला आहे त्यासाठी प्रकाश आंबेडकर उद्या बीडला येत आहेत. एकीकडं वंचित बहुजन आघाडीने ऊसतोड कामगारांच्या संदर्भामध्ये कारखानदारांनी कामगारांचे नेतृत्व करू नये अशी भूमिका घेतली आहे तिथे भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सुद्धा ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर आक्रमक पाहायला मिळतायेत.


ऊसतोड कामगारांच्या मजुरी संदर्भातला निर्णय हा यापूर्वी लवाद करत असे आणि लवकरच यासंदर्भात जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या सोबत बैठक होणार असल्याचे ही आज पंकजा मुंडे यांनी सांगितले होते मात्र त्या नंतर सुरेश धस यांनी 28 तारखेला पुण्यामध्ये साखर संघाच्या बैठकीसाठी ऊसतोड कामगारांच्या संघटनांच्या प्रतिनिधींना बोलावलं आहे त्या बैठक कीतच चर्चा होईल असा पवित्रा घेतला आहे.


मागच्या काही दिवसांपासून ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासंदर्भात सुरेश धस हे बैठका घेत होते मात्र आज पहिल्यांदा त्यांनी जाहीरपणे पंकजा मुंडे यांच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे त्यामुळे ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर भाजपातील दोन नेत्यांच्या वेगळ्या भूमिका सध्या पाहायला मिळत आहेत.