मुंबई : आज विजयादशमी दसरा. या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे लक्ष लागून असते. आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. गेल्या अनेक दिवसांचा राहिलेला हिशोब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चुकता करणार आहे. त्यामुळे या मेळाव्यात ठाकरेंच्या भात्यातले बाण कुणाकुणावर चालणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. कारण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले उद्धव ठाकरे शिवसैनिकांना दसरा मेळाव्याला संबोधणार आहेत.


शिवसेना पक्षप्रमुख ते मुख्यमंत्री आणि शिवाजी पार्क ते सावरकर हॉल असा यंदाचा दसरा मेळावा असणार आहे. ठाकरे कुटुंबियांतली पहिली व्यक्ती मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतरचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी यंदाचा दसरा मेळावा हा काहीसा खास आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या संकंटानं अनेक प्रथा, परंपरा मोडीत निघाल्या राजकारणातही शिवसेनेचे शिवतीर्थावर दसरा मेळावा साजरा करण्याची एक वेगळी परंपरा आहे. पण कोरोनाचं संकंट असल्यामुळे यंदा सावरकर सभागृहात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.


कसा असणार आहे कार्यक्रम?


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघून थेट शिवतीर्थावर येतील.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतील.
सावकर सभागृहात मेळाव्याच्या सुरुवातीला शस्त्रपुजन होईल.
काही महत्त्वाच्या नेत्यांची भाषणं होण्याची शक्यता आहे.
त्यानंतर 7 वाजता उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधतील
बाळासाहेब ठाकरेंपासून या मेळाव्याला महत्त्व आहे. बाळासाहेबांचं भाषण ऐकण्यासाठी लाखो लोक राज्यभरातून जमत असे बाळासाहेबांची भाषणांची शैली, अभिनय, अधुनमधुन शिव्या आणि विरोधकांवर टीका ही सैनिकांना हवहवीशी वाटणारी होती. दसरा मेळाव्यातून बाळासाहेबांच्या भाषणातून लाखो शिवसैनिक विचारांचे सोने लुटत. या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतायत याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागल आहे.


2019 च्या निवडणुकांनतर महाराष्ट्रातली बरीच गणित बदलली. महाविकास आघाडीच्या रुपानं महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्यात भाजप हा एकमेव पक्ष असेल ज्यांचा खरपूस समाचार घेतला जाणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र, मुंबई आणि शिवसेनेवर विरोधकांकडून चिखलफेक करण्यात आली. सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू, अर्णब गोस्वामी आणि कंगना रनौतचं प्रकरण या सर्वांवर उद्धव ठाकरे शांत होते. या प्रकरणावरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड संताप होता पण उद्धव ठाकरेंनी अतिशय संयमी भूमिका निभावली पण आपण मुख्यमंत्री पदाचा मास्क काढून काही विषयांवर बोलणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यामुळे या प्रकरणावर काय बोलणार हे उत्सुकतेचं असणार आहे.


 विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत
नागपूर:  सरसंघचालक मोहन भागवत यंदा विजयादशमी उत्सवात अवघ्या 50 लोकांच्या उपस्थितीत संबोधन करणार आहेत. स्वयंसेवकांना मात्र त्यांच्या त्यांच्या ठिकाणातून डिजिटली या विजयादशमी कार्यक्रमात सहभागी होण्याचे निर्देश दिले गेले असून लाखो स्वयंसेवक त्याचे पालन करत डिजिटल/ऑनलाईन पद्धतीने विजयादशमी उत्सवात सहभागी झाले आहे.  वंजारीनागर शाखेतील तरुण आणि बाल स्वयंसेवक डिजिटली / ऑनलाईन पद्धतीने या विजयादशमी उत्सवात सहभागी झाले आहे.  कोरोनामुळे संघाच्या 95 वर्षांच्या इतिहासात संघाचे विजयादशमी उत्सव कार्यक्रम पहिल्यांदाच मैदानावर नाही तर सभागृहात अगदी छोट्या स्वरूपात घ्यावे लागत आहे. आणि लाखो स्वयंसेवकांनी ते बदल सहर्ष स्वीकारत आज ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमात उपस्थिती दर्शविली आहे.


पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने सावरगावच्या भगवान भक्ती गडावरती होणार आहे. भगवानगडावर दसऱ्या दिवशी राजकीय संदेश देण्याची परंपरा होती. मात्र, भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री यांच्या सोबत वाद झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी दोन वर्षांपासून भगवान बाबांच्या जन्मगावी म्हणजे सावरगावमध्ये भगवान भक्तिगड उभा केला आहे. याच ठिकाणी दसऱ्या दिवशी पंकजा मुंडे भगवान बाबाचे दर्शन घेऊन याच ठिकाणी त्या दसरा मेळावा घेत असतात. यावर्षी हा दसरा मेळावा ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे दसरा मेळाव्याला न येता घरी राहून भगवान बाबांची पूजा करून हा दसरा मेळावा ऑनलाइन पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केला आहे. तर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी ऊसतोड कामगारांचा मेळावा ठेवला आहे.