मुंबई : राज्यात जरी शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून कारभार करत असले तरी ठाणे महापालिकेत या दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. आधी लसीकरणावरून झालेल्या तूफान आरोप प्रत्यारोपानंतर आता खारेगाव उड्डाणपुलावरून हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर दंड थोपटून उभे राहिले आहेत. या उड्डाणपुलाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षातील नेते घेत आहेत. 


काल खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांनी या उड्डाणपुलाच्या पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केल्या नंतर आज अचानक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक आणि कार्यकर्त्यांना घेऊन या पुलावर धडक मारली. कळव्यात राष्ट्रवादीचा आमदार, नगरसेवक असल्याने राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी आव्हाड यांनी या भेटीदरम्यान केली. तर त्यानंतर लगेच महापौर म्हस्के आणि खासदार शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होईल अशी प्रतिक्रिया देऊन आव्हाडांना विरोध दर्शविला. खारेगाव पुलाचे काम माझ्या पाठपुराव्यामुळे आणि पालिकेतील तत्कालीन तीन आयुक्तांच्या मेहनतीमुळे झाले असे आव्हाड यांनी सांगितले तर हे शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आणि सत्ताधारी शिवसेनेने महासभेत निधी मंजूर केल्यानेच हे काम पूर्ण झाले अशी प्रतिक्रिया महापौर म्हस्के यांनी दिली. 


खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका करत 'मिशन कळवा' सुरू झाल्याचे सांगितले. कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य असल्याने येणाऱ्या निवडणुकीत सर्व सीट्स शिवसेनेच्या निवडून याव्या यासाठी कामाला लागा असे आदेश महापौर म्हस्के यांनी आज झालेल्या सभेत कार्यकर्त्यांना दिले आहेत. या श्रेयवादाच्या लढाईत एक महत्वाचे म्हणजे जेव्हा 13 वर्ष हा उड्डाणपूल रखडला होता तेव्हा एकही पक्ष इथे फिरकला नाही आता मात्र बांधकाम पूर्ण झाल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी धडपड सुरू असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या