वसई : नववर्षाच्या (New Year) दिवसात मोठा घातपात करण्याच्या षडयंञाला वसई-विरार पोलिसांनी हाणून पाडलं आहे. पेल्हार पोलिसांनी धाडसी कारवाई करत चार आरोपींकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूसासह नकली नोटांच घबाड हस्तगत केलं आहे. हे चार आरोपी नववर्षाला कोणता मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. हे सर्व आरोपी उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत.


नववर्षाच्या स्वागतासाठी आता काही तासांचा अवधी उरला आहे. अशात मुंबईच्या वेशीवर वसई-विरार पोलीसांनी मोठ्या गुन्ह्याचं षडयंत्र हाणून पाडलं. यावेळी पोलिसांनी दोन गावठी कट्टे, 9 जिवंत काडतुसे, 1 चॉपर त्याचबरोबर 44 हजाराच्या नकली नोटासह 4 आरोपींना अटक करण्यात यश मिळवलं आहे. अटक केलेल्यांची नाव डेव्हिड उर्फ़ तारकेश्वर सुर्यबली यादव (21), राहुल कृष्णमुरारी चौहान (20), रामसेवक प्रभुनाथ चौहान (20),  शिवाम रामसुरत यादव(19) अशी आहेत. हे सर्व मूळचे उत्तर प्रदेश येथील राहणारे आहेत.


पेल्हार पोलिसांना गुप्त बतमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, वसईच्या तुंगारा फाटा येथे चार जण गावठी कट्टे घेऊन येणार आहेत. त्या अनुषंगाने पेल्हार पोलिसांच्या पथकाने सापळा रचत चारही आरोपींना पकडण्यात यश मिळवलं आहे. या आरोपींकडून जवळपास 43 हजार 900 रुपये इतक्या 50 आणि 100 रुपयाच्या नकली नोटा, एक चॉपर, दोन गावठी कट्टे, आणि 9 जिवंत काडतुसे असा एकूण 87 हजार 900 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेच्या आधारे पेल्हार पोलीस ठाण्यात 187, 2021 भा.द.वी.489(क),3,25  प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


हे ही वाचा-