पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. आता अशीच एक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं समोर आलं आहे. पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे.  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झालं आहे.


2018 मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले असून त्याची पडताळणी सुरू असल्याची माहिती आहे. या प्रकरणाचा तपास करीत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली.  2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 परीक्षार्थींना पात्र करण्यात आले. 


प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7 हजार 800 परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचं समोर आलं आहे. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. 


काही दिवसांपुर्वी 2013 पासून टीईटीच्या मार्फत भरती झालेल्या राज्यातील सर्व शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत की नाही याची पडताळणी करायचं शिक्षण परिषदेने ठरवलं होतं.  त्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदा, महापालिकाकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांना तसे आदेश देण्यात आले. पुणे सायबर पोलिस सध्या 2018 आणि 2020 मधे झालेल्या टी ई टी घोटाळ्याचा तपास करत आहेत. 


मात्र टी ई टी परिक्षेतील गैरप्रकार 2013 पासून सुरु असल्याचा आरोप होत असल्यानं 2013 पासून शिक्षक म्हणून रुजू झालेल्या सगळ्याच शिक्षकांची ते खरंच पात्र होते का याची तपासणी करायच शिक्षण परिषदाने ठरवलं. मागील पंधरा दिवसात राज्यातून साडेपाच हजार शिक्षकांनी आपल्याकडे सर्टीफिकेट पाठवल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून सांगण्यात आलं आहे.


मात्र 2019 - 2020 च्या एका परिक्षेत साडे सात हजार अपात्र शिक्षकांना पात्र ठरवल्याचं समोर आलंय.  त्यामुळे 2013 पासून अशाप्रकारे गैरमार्गाने पात्र ठरलेल्या शिक्षकांची संख्या आणखी वाढणार आहे.  यातील अनेक शिक्षक शाळांमधे नियुक्त झाले असुन ते मुलांना शिकवत आहेत.


महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे पाच अधिकारी सायबर पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन मदत करत आहेत.  तुकाराम सुपे आणि सहकाऱ्यांच्या कॉम्प्युटर्समधून मिळालेली माहिती,  वेगवेगळ्या एजंट्सकडून मिळालेली माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या माहितीशी पडताळून पाहिल्यावर सायबर पोलीस या निष्कर्षांपर्यंत पोहोचले आहेत.


इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha 





Education Loan Information:

Calculate Education Loan EMI