धुळे: ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, सुख- दुःखाला धावणारी आणि आंदोलकांची पहिली टार्गेट असलेल्या, अशा तुमच्या आमच्या एसटीचा आज वाढदिवस आहे.

1 जून 1948 रोजी अहमदनगर - पुणे मार्गावर पहिली एसटी बस धावली. या सत्तर वर्षाच्या प्रवासात एसटीनं अनेक उन्हाळे , पावसाळे अनुभवले. सव्वा लाख कर्मचारी हा एसटीचा एक अविभाज्य भाग आहे. या सत्तर वर्षाच्या कालावधीत सरकार बदलले, तसे तसे एसटीचे रंग बदलत गेले.एसटीची रचनाही बदलत गेली.

तीन जण बसणाऱ्या सीटवर आता दोन प्रवासी बसतील अशी टू बाय टू पुश बॅक सीट आले. अनेकविध रंगात आज एसटी आपल्याला दिसते. सव्वा लाख कर्मचाऱ्यांच्या परिवाराची जबाबदारी एसटी आजदेखील स्वत: पेलत आहे.

सध्या मंत्र्यांच्या गाड्यांना लाल दिवा नसला, तरी लाल दिव्याच्या गाड्यांना टोल माफ आहे. आमदार, खासदारांच्या गाड्यांना टोल माफ . मात्र ज्या लोकांनी या आमदार, खासदारांना निवडून दिलं, त्या सर्वसामान्य जनतेची जिव्हाळ्याची असलेल्या एसटीला मात्र टोल माफी नाही.

इतकंच काय एसटीला प्रवासी करदेखील खासगी बसेस आणि इतर राज्यांच्या तुलनेने अधिक आहे.

डिझेल आणि विविध करांमुळे एसटीची अवस्था बिकट झाली आहे. त्यातच एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, तुटपुंज्या पगारामुळे होणारे संप, कोर्टाच्या वाऱ्या अशा अनेक कारणांमुळे एसटी मेटाकुटीला आली आहे.

काही संघटनाच्या आडमुठे धोरणामुळे ना एसटीचा विकास होतोय, ना एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा प्रश्न मार्गी लागतोय.

आता तर शिवशाहीच्या नावाखाली एसटीत ठेकेदारी जोपासली जातेय. शिवशाहीचा चालक ठेकेदाराचा, तर वाहक एसटीचा, असं सूत्र राबवलं जातंय.

ठेकेदाराच्या चालकाला मिळणार पगार हा एसटीच्या चालकाला मिळणाऱ्या पगाराच्या तुलनेत दुप्पट आहे. असं असतांनादेखील या ठेकेशाही चालकांच्या मनमानीचे किस्से प्रवाशांना अनुभवास आले आहेत. यावर एसटी प्रशासनाने काय कारवाई केली ? हे ते प्रशासनच जाणे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांचा गणवेशाचा मुद्दादेखील सध्या चर्चेचा विषय आहे. अजूनही ६५ ते ७० टक्के कर्मचाऱ्यांपर्यंत एसटीचा नवीन गणवेश पोहचलेला नाही. आता तर पावसाळा काही दिवसावर आला आहे.  एसटी कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात देण्यात येणारे रेनकोटसुद्धा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचलेले नाहीत.

एसटीचे आधुनिकीकरण करण्याबाबत दुमत नाही. मात्र यासोबतच त्यासाठी असलेल्या प्राथमिक सुविधांना बाधा निर्माण होणार नाही, याची दक्षता एसटी प्रशासनाने घ्यायला हवी. बस स्थानक परिसराजवळ खासगी बस वाहतुकीला बंदी असताना, काही बस स्थानकाच्या परिसरातून खासगी वाहतूकदार एसटीचे प्रवाशी वळवतात . यामागे असलेल्या रॅकेटवर आजतागायत कारवाई होत नसल्यानं, हे रॅकेट कोणाच्या आशीर्वादानं एवढी दादागिरी करतंय , हे सुज्ञाला सांगण्याची गरज नाही.

एसटीचे वर्कशॉप, तिथे स्पेअर पार्टसचा पुरेसा साठा आहे का ? इंजिन ऑईलची काय अवस्था आहे ? टायरची स्थिती काय ? रेडिएटरची परिस्थिती काय? हेडलाईटची स्थिती काय ? सगळ्यात महत्वाचे म्हणजे एसटीचे ब्रेक उत्तम काम करतात का? एसटीमधील आसनाची स्थिती काय? याचा आढावा वेळोवेळी घेतला जातो काय? यासर्व बाबींचं ऑडिट होतं का? हेदेखील एसटीचे आयुष्य वाढवण्यासाठी महत्वाचं मुद्द आहे. मात्र चालत आहे चालू द्या अशी सध्या स्थिती आहे.

ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांना विविध सवलती दिल्या जातात, त्याचप्रमाणे आता एसटीदेखील ज्येष्ठ नागरिक झाल्याने एसटीला सरकारनं विविध सवलत द्यायला हवी. जसे की,  प्रवासी कर, इंधन कर , टोल टॅक्स, यातून एसटीला सवलत दिल्यास एसटीला आणखी भरभराटीचे दिवस येतील.

यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पक्षभेद विसरुन, एकजुटीने  प्रयत्न करायला हवेत. ग्रामीण भागातील जनतेच्या सुख दुःखाला धावून जाणाऱ्या या एसटीला दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.