अहमदनगर : अहमदनगरच्या चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी 51 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.

चौंडीतील अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात गुरुवारी घोषणाबाजी, खुर्च्यांची फेकाफेक, तसंच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. या दगडफेकीत संदीप पवार नावाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे  पोलिस गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणात डॉक्टर इंद्रकुमार भिसे आणि सुरेश कांबळे यांच्यासह 100 ते 150 कार्यकर्त्यांवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या उपस्थितीत पालकमंत्री राम शिंदे यांच्या भाषणावेळी सुरेश कांबळे 70 ते 80 कार्यकर्त्यांचा जमाव घेऊन आला. जमावाने गोंधळाला सुरुवात केल्याने पोलिसांनी कांबळेला ताब्यात घेतलं. मात्र जमावाने धक्काबुक्की करत पोलिसांवर दगडफेक केली. यात पोलिसांच्या गाड्यांच्या काचा फुटल्या, तसंत पाच पोलिसांना दगडही लागले. यानंतर जामखेड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. त्यांच्यावर पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा, कटकारस्थान, जमावबंदीचं उल्लंघनसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अहमदनगरच्या चौंडीत अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात गोंधळ

तर दुसऱ्या तक्रारीनुसार, जयंती उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर इंद्रकुमार भिसे 40 ते 50 कार्यकर्त्यांसह आले. धनगर समाजाच्या आरक्षणावरुन घोषणाबाजी करुन पत्रकं फेकण्याचा प्रयत्न केला. गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर पोलिसानी भिसेला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावाने पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न केला. गाडीत टाकताना भिसेने हाताला झटका संदीप पवार नावाच्या पोलिसाच्या डोक्यात दगड घातला.

त्याच्यावरी पोलिसांवर हल्ला, सरकारी कामात अडथळा, कटकारस्थान, जमावबंदीचं उल्लंघनसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.