शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याने 81 वर्षीय डॉक्टरवर तलवार हल्ला
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 01 Jun 2018 09:03 AM (IST)
औरंगाबादेतील 81 वर्षीय डॉक्टर पांडुरंग काळे यांनी शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून आरोपीने त्यांच्यावर तलवार हल्ला केला.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एकीकडे ऑनलाईन शस्त्र खरेदीमुळे खळबळ उडाली असतानाच शहरातील प्रसिद्ध डॉक्टरवर तलवार हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. अत्यंत क्षुल्लक कारणातून हा हल्ला झाल्याची माहिती आहे. 81 वर्षीय डॉक्टर पांडुरंग काळे यांच्यावर शेवगा तोडल्याचा जाब विचारल्याच्या रागातून तलवार हल्ला करण्यात आला. औरंगाबाद शहरात गादिया विहार भागात ही काल (गुरुवारी) घटना घडली. काही दिवसांपूर्वी डॉ. काळे यांनी आपल्या घरासमोरील शेवग्याच्या शेंगा का तोडल्या, असा जाब आरोपी विजय साबळे याला विचारला होता. याचा राग मनात धरुन त्याने स्कूटरवरुन घरीच जाणाऱ्या डॉक्टरांवर तलवारीने हल्ला केला.