लातूर: तुमचं वीज बिल आजवर हजार रुपये येत असेल, तर ते आता 1 हजार 350 रुपये येणार आहे. कारण तुम्हाला वीज पुरवणाऱ्या महावितरणला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे. आणि हाच तोटा पुन्हा ग्राहकांकडूनच भरुन काढण्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केली आहे.

गेल्या दीड वर्षात महावितरण कंपनीला तब्बल 30 हजार 842 कोटींचा विक्रमी तोटा झाला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी आता ग्राहकांच्या खिशाला कात्री लावली जाण्याची शक्यता आहे.

महावितरणनं घरगुती वापरासाठी 5 टक्के तर कृषी आणि इतर वापरासाठी 35 टक्के इतक्या दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड सहन करावा लागू शकतो.

वीज आहे पण खरेदीदार नाही

महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या उद्योगांनी महागड्या विजेमुळे महावितरणच्या विजेला रामराम केला आहे. त्यामुळे कंपनीकडे वीज आहे पण खरेदीदार नाही अशी अवस्था झाली आहे. परिणामी महाराष्ट्रातली आजवरची सर्वात मोठी वीजदरवाढ करण्याची मागणी कंपनीने वीज नियामक आयोगाकडे केली आहे.

विजय मल्ल्या....निरव मोदी....डीएकसे अशा सगळ्या महाभागांना मागं टाकणारा कारभार महाराष्ट्रात घरोघरी वीज पुरवणाऱ्या महावितरण कंपनीनं करुन ठेवला आहे. एअर इंडिया प्रमाण महावितरण पूर्ण डब्यात गेली आहे.

महावितरणला तब्बल 30 हजार 842 कोटींचा तोटा झाला आहे. पुन्हा ग्राहकांकडूनच तोटा भरुन काढण्यासाठी कंपनीने जबरदस्त दरवाढ प्रस्तावित केली आहे.

महावितरण डब्यात का गेली?

  • लोड शेडिंगच्या काळानंतर आलेल्या नव्या प्रकल्पांशी केलेले दीर्घ मुदतीचे करार.

  • या कारारामुळे वीज विकत न घेताच खासगी कंपन्यांना द्यावे लागणारे स्थिर चार्जेस.

  • औरंगाबाद, कल्याण, नागपूर, पुणे या विभागीय कार्यालयांची निर्मिती.

  • विभागीय कार्यालयांसाठी संचालक, अधिकाऱ्यांची पदं आणि त्यावर होणारा ५०० कोटींचा खर्च.

  • महावितरणमध्ये वाढलेलं अतांत्रिक लोकांचं वर्चस्व


महावितरणला 2018 च्या सहा महिन्यात ग्राहकांच्या खिशातून 15 हजार 714 कोटी आणि 2019-20 या वर्षात 15 हजार 128 कोटी रुपये वसुल कारायचे आहेत. कालच असा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला सादर झाला.

प्रस्ताव मान्य झाल्यास कोणाला किती वीज महाग मिळेल?

- घरगुती ग्राहकांसाठी 100 युनिटच्या पुढे 5 टक्के दरवाढ

- कृषी पंपासाठी आजवरच्या इतिहासातली 35 टक्के दरवाढ प्रस्तावित

-  सार्वजनिक पाणी पुरवठा, पथदिवे, शाळा, रुग्णालये, औद्योगीक निर्मितीसाठी 2 टक्क्यांपासून 20 टक्क्यांपर्यंत दरवाढ

-- रेल्वे, मोनो रेल, मेट्रो, कृषी पंप, मॉल्स, कृषीपंपाच्या स्थिर आकारात तब्बल 109 टक्क्यांची वाढ प्रस्तावित आहे.

सध्या खुल्या बाजारात 2 रुपये 50 पैसे दरानं वीज उपलब्ध आहे. महावितरणच्या विजेचा दर किमान 4 रुपये आहे. त्यामुळे अनेक मोठे औद्योगिक ग्राहक, रेल्वे यांनी महावितरणला रामराम ठोकलाय. सध्या महावितरणकडं वीज आहे पण कोणी विकत घेत नाही अशी अवस्था आहे.