सांगली : 'बालभारती'कडून एका पाठासाठी नवोदित लेखकांना दरवर्षी अवघे दोनशे रुपये मिळतात. एका धड्यासाठी लेखकांना तुटपुंजं मानधन मिळत असल्याची बाब समोर आली आहे.
अलिकडच्या अभ्यासक्रमात काही नव्या दमाच्या साहित्यिकांना संधी मिळाली असून त्यांचे काही पाठ पुस्तकात घेतले गेले आहेत. सांगली जिल्ह्यातील आमणापूरचे संदीप नाझरे हे त्यापैकीच एक. त्यांचा 'पण थोडा उशीर झाला' हा सैनिकाच्या जीवनावरील ह्रदयस्पर्शी पाठ बालभारतीमध्ये प्रकाशित झाला आहे.
धड्यासाठी मिळणारे वार्षिक मानधन हे फारच तुटपुंजे असल्याचे समोर आले आहे. नाझरे यांना नुकतंच बालभारती कडून दोनशे रुपयांचा चेक मिळाला.
एका बाजूला हा धडा शिकवणाऱ्या शिक्षकाचे दिवसाचे वेतन किमान एक हजार रुपये असताना तो धडा लिहिणाऱ्याला मात्र अवघ्या दोनशे रुपयांवर समाधान मानावे लागत आहे. यावर सर्वच लेखक वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.