अहमदनगर: स्वत:चं लग्न खास ठरावं, यासाठी अनेकजण काहीतरी खास करत असतात. श्रीरामपूर तालुक्यातील एका नवरीनेही अशीच एक खास गोष्ट केली. मात्र ही नवरी सामान्य नाही तर राज्यपातळीवरील तिरंदाज खेळाडू आहे.

स्वामिनी उनवणे असं तिचं नाव. तिरंदाजीत राज्यपातळीवर चमक दाखवल्यानंतर, स्वामिनी आयुष्याची नवी इनिंग सुरु करत आहे. मात्र खेळाबद्दल ती विशेष जागरुक आहे.

त्यामुळेच स्वामिनीने खेळाला आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग मानला आहे. त्याच हेतूने स्वामिनीने स्वत:च्या लग्नात, थेट तिरंदाजीची प्रात्यक्षिकं दाखवली, तिरंदाजीला मानवंदना दिली, त्यानंतरच ती बोहल्यावर चढली.



शिवाय विवाहानंतरही तिरंदाजीचा सराव सुरुच ठेवून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारण्याचा तिचा मानस आहे.

स्वामिनी गेल्या अनेक वर्षांपासून तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत असून विवाहाच्या दिवशी विवाह बंधनात अडकण्यापूर्वी स्वामिनीने आपल्या कलेचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या मंडपात स्टेजवर तिरंदाजी बोर्ड लावून धनुर्विद्येची प्रात्यक्षिके सादर करत खेळाला मानवंदना दिली. आपल्या खेळाचा प्रसार व्हावा अशी आपली इच्छा होती म्हणूनच आपण हा निर्णय घेतला असल्याचं स्वामिनीने सांगितलं.

भिवंडी येथील सुधीर भांगे यांचे पुत्र प्रसाद यांच्यासोबत स्वामिनीने लगीनगाठ बांधली. पत्नीला भविष्यकाळात जी मदत करता येईल, ती करण्याचं आश्वासन यावेळी सुधीर यांनी दिलं.

या लग्नाला स्वामिनीच्या प्रशिक्षकांनीही हजेरी लावली होती. यावेळी स्वामिनीने आपल्या  कलेला दिलेली मानवंदनेमुळे  तिरंदाजी खेळाला ग्रामीण भागात पोहोचवण्यास मदत होईल, असं तिच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.

आधी लगीन कोंडाण्याचं... असं इतिहासात आपण ऐकलंय. मात्र आपल्या कलेचा सन्मान आधी, त्यानंतर लग्न असं काहीस नगरमध्ये पाहायला मिळालं. स्वामिनीने घेतलेल्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.