Nashik Onion Issue News : शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख. खास करून कांद्याचा विचार केला तर कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याला देशासह परदेशातही मोठी मागणी असते. श्रीलंका, मलेशिया तसेच सिंगापूरमध्ये कांद्याची सर्वाधिक निर्यात होते मात्र सध्या कांद्याची निर्यात करणारे व्यापारीच आर्थिक संकटात सापडले आहेत आणि याला कारण ठरतंय ते म्हणजे आर्थिक दिवाळखोरीत निघालेला श्रीलंका देश. कांद्यासाठी बांगलादेश नंतर भारताचा दुसरा मोठा ग्राहक हा श्रीलंका आहे. 


एकट्या नाशिक जिल्ह्यातून आठवड्याला जवळपास दोनशे कंटेनर म्हणजेच जवळपास तीन ते साडेतीन हजार टन कांदा हा श्रीलंकेत दाखल होतो. मात्र गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्याने मागील महिन्यापासून ही निर्यात 50 ते 60 टक्क्यांनी कमी झाली आहे.  व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना रोख पैसे देऊन त्यांनी कांदा खरेदी करत श्रीलंकेला उधारीत तो पाठवला तर खरा मात्र गेल्या सहा महिन्यांपासून योगेश ठक्कर या एका निर्यातदाराचे 50 कंटेनरचे जवळपास 4 कोटी रुपये हे श्रीलंकेच्या आयातदारांकडे थकीत आहेत.   सरकारने तातडीने याबाबत काहीतरी तोडगा न काढल्यास यापुढे गंभीर परिस्थितीला आपल्याला तोंड द्यावे लागेल अशीच भिती निर्यातदार व्यक्त करतायत.


कांदा निर्यातदार योगेश ठक्कर यांनी सांगितलं की, आम्ही माल पाठवत राहिलो मात्र त्यानंतर पैसे येणेच बंद झाले. त्यांच्या सरकारकडे आता डॉलरच नसल्याने पैसे मिळत नाहीत. भारत सरकारने लक्ष घालावे, नाशिक जिल्ह्यातून दीडशे ते दोनशे कंटेनर आठवड्याला जात होते, म्हणजे जवळपास साडेतीन हजार टन पण आता मागील महिन्यापासून हजार टनावर आलाय. 40 ते 50 कंटेनरचे माझे पैसे अडकले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर माल पाठवणे आम्हाला पूर्ण बंद करावे लागेल याचा फटका शेतकऱ्यांना बसेल, रेट कमी होईल. आता शेतकऱ्यांकडून माल घ्यायलाही पैसे नाहीत, असंही ठक्कर यांनी सांगितलं आहे. 


तर कांदा निर्यातदार विकास सिंह म्हणतात की, बांगलादेशनंतर कांद्याचा दुसरा मोठा ग्राहक श्रीलंका. मुंबईतून 200 ते 250 कंटेनर आठवड्याला जातो तर भारतातून साडेपाच ते सहा हजार टन कांदा आठवड्याला जातो. यंदा कांदाचे उत्पादन अधिक झाले आहे पण निर्यात होत नसेल तर संकट आहे. पैसेच नाही मिळाले तर व्यापार कसा होणार ? आम्ही पत्रव्यवहार करतोय सगळीकडे, क्रेडिट लाईन भारत सरकारने ऑफर केल्याचं कळतंय पण आरबीआयच्या बँकांना गाईडलाईन्स आलेल्या नाहीत. आमच्यासमोर 40 टक्के कांदा सध्या आहे जो दहा दिवसात विकायचा आहे. शेवटचा घटक शेतकरी असल्याने त्याला सर्वाधिक फटका बसेल. भारत सरकारने काहीतरी करावं, 80  टक्के शेतमाल भारतच श्रीलंकेला पाठवते. जवळपास एक वर्षांपासून सुरु होते. पुढे काय होईल सांगता येत नाही, असं सिंह म्हणाले.


विशेष म्हणजे या सर्व गोष्टींची झळ सर्वाधिक सोसावी लागणार आहे ती शेवटी बळीराजाला. आधीच अवकाळी पाऊस, सरकारचे बदलते धोरणं, इतर राज्यातून येणारा कांदा या सर्व परिस्थितीमुळे कांद्याचे दर गेल्या काही दिवसांपासून कमालीचे कोसळले आहेत. विजेची समस्या, महागाईचा सामना करत शेतात राब राब राबून बळीराजा कांदा तर पिकवतोय मात्र त्याला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत नसल्याने तो आधीच चिंतेत आहे. जर श्रीलंका दिवाळखोरीत गेल्याने तिकडे कांद्याची निर्यात झाली नाही आणि व्यापाऱ्यांनी  शेतकऱ्यांकडून माल खरेदी करणे बंद केले तर कांदा हा चाळीत पडून राहील परिणामी त्याचे दर हे कमालीचे घसरतील.


हे संकट फक्त नाशिकच्याच नाही तर भारतातील सर्वच निर्यातदारांवर कोसळलं आहे. श्रीलंकेतील परिस्थिती पूर्वपदावर कधी येईल हे सांगणं सध्या तरी अवघड असल्याने सरकारने याबाबत तात्काळ काहीतरी पाऊलं उचलणं हे गरजेचं बनलं आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha