Solapur : मनसे विद्यार्थी सेनेच्या (MNVS) वतीने सीबीएससी बोर्डाच्या (CBSE Exam) परीक्षेच्या वेळापत्रकाला आक्षेप करण्यात आला आहे. सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी (Shiv Jayanti) सुट्टी न देता परीक्षा ठेवल्याने हा आक्षेप घेण्यात आला आहे. तर सीबीएससी बोर्डाने 19 फेब्रुवारीचा पेपर रद्द न केल्यास मनसे विद्यार्थी सेनेकडून हा पेपर बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सीबीएसई बोर्डाने 2024 इयत्ता दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी दहावी बोर्डाच्या वेळापत्रकात 'संस्कृत' विषयाचा पेपर घेण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मनसे तर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात आले आहे.


 



CBSE बोर्ड जाणीवपूर्वक कृत्य करत आहे, पालकांचा आरोप


छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. जगभरासह महाराष्ट्रात 19 फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस उत्साहाने साजरा केला जातो. मात्र याच दिवशी सीबीएसई बोर्डाने संस्कृत विषयाचा पेपर नियोजित केला असल्यामुळे तसेच या दिवशी सुट्टी नसल्यामुळे मनविसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान याची तक्रार काही पालकांनी मनसेकडे केली असल्याचे समजते. महाराष्ट्र शासनाने अधिकृत सुट्टी जाहिर केलेली असताना सीबीएसई बोर्डाने राज्यातील शिक्षण विभागाशी समन्वय साधणे आवश्यक होते. तसेच बोर्डाच्या परीक्षांचे नियोजन करताना शासकीय सुट्ट्यांबाबत विचार केला जातो, मात्र CBSE बोर्ड जाणीवपूर्वक कृत्य करत आहे असा आरोप काही पालकांकडून करण्यात आला. त्यामुळे सीबीएसई बोर्डाने शिवजयंतीच्या  दिवशी होणारा पेपर रद्द करावा अशी मागणी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे. 



शिवजयंतीच्या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही, मनविसेचा इशारा


CBSE बोर्डाची वार्षिक परीक्षा आजपासून सुरू होत असून ही परीक्षा 2 एप्रिलपर्यंत चालणार आहे. मात्र या परीक्षेच्या वेळापत्रकात 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशीच सीबीएसई बोर्डाचा संस्कृत विषयाचा पेपर आहे. शिवजयंतीच्या दिवशी सीबीएसई बोर्डाकडून परीक्षा ठेवत महाराष्ट्राच्या दैवताचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात येत आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. सीबीएसईकडून 19 फेब्रुवारीचा संस्कृत विषयाचा पेपर रद्द न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना या दिवशी परीक्षा होऊ देणार नाही. असा इशारा देण्यात आला असून तात्काळ सीबीएसई बोर्डाच्या व्यवस्थापकांना परीक्षा रद्द करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.


 


हेही वाचा>>>


Maharashtra Politics : काँग्रेसला खिंडार! अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आज पुन्हा काँग्रेसची बैठक, कोणते आमदार गैरहजर?