दौंड, पुणे : दौंडच्या पुर्व भागातील (Daund News) वनक्षेत्रातील वनजमीनीतून बेकायदा (Pune Rular Forest) वृक्षतोड, कोळसा खाणी आणि बेकायदा माती उत्खनन सुरू होते. या प्रकरणी पुणे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दौंडचे वनपाल रवींद्र धनाजी मगर आणि वनरक्षक किरण कदम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत निलंबनाची कारवाई केल्याने नंतर आता दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील मलठण, वाटलुज, नायगाव, राजेगाव या गावांमधील भीमा नदीच्या पट्ट्यातील वन विभागाच्या वनक्षेत्रात काही दिवसांपासून बेकायदा वृक्षतोड सुरू होती. 



या भागात दहा ते पंधरा बेकायदा कोळसा भट्ट्या सुरू होत्या. याबाबत मलठण ग्रामस्थांनी दौंड तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे कारवाईची लेखी मागणी केली होती. मात्र दौंड तालुका वनपरिक्षेत्राधिकारी कल्याणी गोडसे यांच्यासह या भागातील वनपाल व वनरक्षक यांनी प्रकरणाची दखल घेतली नाही. मलठण ग्रामस्थांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांच्यावर कारवाई करण्याची लेखी तक्रार मलठण ग्रामस्थांनी पुणे वनविभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांच्याकडे केली होती. 


 या तक्राराची त्वरित दखल घेत आणि घटनेचे गांभीर लक्षात घेऊन पुणे वन विभागाचे सहाय्यक उपवनसंरक्षक दिपक पवार यांनी तालुक्यातील मलठण, राजेगाव, नायगाव, वाटलुज या भागातील वनक्षेत्राला भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांसोबत या परिसराची पाहणी केली. या भागातील वन विभागाच्या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून वनक्षेत्राचे मोठे नुकसान केल्याचे यावेळी निदर्शनास आले होते. त्यावरून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.


आमच्या तपासणीत या परिसरातील सुमारे 6 हेक्टर बेकायदा वृक्षतोडीमुळे बाधित झाल्याचे निदर्शनास आले असून निलंबनाच्या कारवाईनुसार या भागात जबाबदार असलेल्या वनाधिकाऱ्याचा निष्काळजीपणा दिसून आला. वनरक्षक रवींद्र धनाजी मगर, किरण कदम आणि वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांच्यावर कारवाई करण्यात आली. बेकायदेशीररित्या तोडण्यात आलेल्या झाडांचे काय झाले आणि खाणींमधून काढण्यात आलेल्या कोळसा आणि मातीचे काय झाले, हे जाणून घेण्यासाठी आता आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. इतर ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत का, याचा शोध घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असल्याचं दीपक पवार यांनी सांगितलं आहे. 


इतर महत्वाची बातमी-


सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरतं मर्यादित न ठेवता, भारतरत्न द्यावा; शरद पवारांचं केंद्र सरकारला आव्हान