मुंबई : विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजन साळवींच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल नार्वेकर विरुद्ध शिवसेनेचे राजन साळवी अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे  आगामी काळात अध्यक्ष महोदय असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे.  दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना  आमदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. 


विधानसभा अध्यक्षपद निवडणूक उद्या होणार आहे. दरम्यान शिवसेनेने आपला उमेदवार उभा  करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. शिवसेनेचे राजन साळवी  यांना निवडुन आणण्यासाठी शिवसेनेने सर्व आमदारांना व्हिप बजावला आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांना देखील उद्या व्हीप बजावला आहे. आता एकनाथ शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत  महाडचे आमदार भरत गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती केली आहे. एकनाथ शिंदेच्या गटाने देखील या अगोदर व्हीप बजावला आहे. त्यामुळे शिंदे यांचा गट उद्धव ठाकरेंच्या गटाला भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्याची शक्यता आहे.


पक्षादेशात काय लिहिलंय?


महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै 2022 आणि सोमवार 4 जुलै 2022 रोजी विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे. रविवारी 3 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभा सभागृहात अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेना पक्षातर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.  या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून साळवी यांना मतदान करावे, असा पक्षादेश आहे.




दरम्यान महाविकास आघाडीने विधनासभा निवडणुकीसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. महाविकास आघाडीचे नेत्यांचे म्हणणे आहे की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण असताना विधानसभा निवडणुका कशा काय घेण्यात येत आहे. या संदर्भात आम्ही  पत्र लिहित तक्रार देखील केली होती. महाराष्ट्र विधासभा अध्यक्षांचे पद दोन वर्षापासून रिक्त आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत होते.  आता शिवसेनेत दोन गट पडल्याने आमदार  कोणता पक्षादेश पाळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता उद्या होणाऱ्या निवडणुकीत कुणाची सरशी होणार हे स्पष्ट होईल.