अमरावती: व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या ही उदयपूर पॅटर्न प्रमाणेच झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानेच ही हत्या झाल्याचं प्रथमदर्शी तपासात उघड झाल्याचं तब्बल 11 दिवसांनी पोलिसांनी सांगितलं आहे. तर ही हत्या म्हणजे पोलीस आयुक्त आरती सिंह यांचं अपयश असून त्यांना पदावरुन हटवण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली. 


ही हत्या उदयपूरच्या पॅटर्नप्रमाणेच झाली असून याला पोलीस आयुक्त आरती सिंह याच जबाबदार असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. आरती सिंह यांना पदावरुन तात्काळ हटवावं अशा आशयाचं पत्रही त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पाठवलं आहे. दरम्यान, या हत्येचा तपास आता एनआयए करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. 


 






याप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. राज्यातील सरकार बदलताच फायनली, हत्येच्या 11 दिवसांनंतर हे ऑफिशियली बाहेर आल्याची चर्चा आहे. सोशल मीडियावर नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्यानेच हत्या झाल्याचा प्रथमदर्शी तपासात उघड झालं आहे. ही माहिती अमरावती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे.




काय आहे घटना? 
21 जून रोजी अमरावतीतील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली होती. कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या काही पोस्ट व्हायरल केल्या होत्या, असा दावा खासदार बोंडे यांनी केला आहे. त्यामुळे ही घटना उदयपूरप्रमाणे असल्याचा आरोप बोंडे यांनी केला आहे. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी एनआयएचं (NIA) पथक अमरावतीत दाखल झालं आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली असली तरी या हत्येचा सूत्रधार शोधण्यासाठी एसआयटीमार्फत चौकशी (SIT) करण्याची मागणी भाजपनं केली होती. अशातच, एटीएस (ATS) याप्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. 


महाराष्ट्र एटीएसचे पथक अमरावतीमध्ये या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एटीएसच्या सूत्रांनी सांगितलं की, ते या प्रकरणाचा दहशतवादाशी संबंध आहे का? याचा तपास करत आहे. उदयपूरच्या आरोपींप्रमाणे अमरावतीच्या आरोपींनीही हाच नमुना वापरला आहे का, याचा तपास एटीएस करत आहे. तपास अजूनही स्थानिक पोलिसांकडे आहे, पण एटीएस समांतर तपास करत आहे. एटीएसच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, महाराष्ट्र एटीएसचं पथक गेल्या काही दिवसांपासून अमरावतीत आहे.