Uddhav Thackeray : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. तसेच शिंदे गटावर जोरदार टीका केली. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. पाहुयात उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे
1) शिवसेना एकच आहे एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना मानत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
2) लोकप्रतिनिधी म्हणजे पक्ष हा शिंदे गटाचा दावा हास्यास्पद असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील तर उद्या उद्योगपती देखील पंतप्रधान होतील असे उद्धव ठाकरे म्हणाले.
3) अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीआधी शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठावलं होतं, त्यावरुन उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली.
4) शिंदे गटाचे 16 सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण, सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. आम्ही सर्व गोष्टींची पूर्तता केल्याचे ठाकरे म्हणाले.
5) लोकशाहीचं रक्षण करावं अशी निवडणूक आयोगाला विनंती असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कारण पक्षांतर्गत घटनेचं पालन आम्ही पूर्ण केलं असल्याचे ते म्हणाले. शिंदे गटाला घटनाच नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
6) सर्वोच्च न्यायालयाने आधी निर्णय द्यावा. न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको असेही उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं? हे आम्ही सांगू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
7) शिवसेनेत मुख्य नेता हे पद घटनाबाह्य आहे. ज्या शिंदे गटानं शिवसेनेवर दावा सांगितला आहे, त्यांनी शिवसेनेची घटना आम्हाला मान्य नाही असे सांगितले आहे. विभागप्रमुख हे पद शहरापुरते मर्यादीत असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
8) अपात्रतेचा निर्णय आधी होणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
9) सर्वोच्च न्यायालयावर अंकुश ठेवण्याचं काम केलं जात आहे. हे आरोग्यदायी लोकशाहीचं लक्षण नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
10) निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबींची पूर्तता आम्ही केली आहे. तरीही आमच्या शपथपत्रावर आक्षेप घेतल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: