मुंबई :   विधानपरिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election)  निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झालाय. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का अशी चर्चा सुरु झालीय  एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यानंतर नारायण राणेंनी "शाब्बास एकनाथजी,योग्य वेळी योग्य निर्णय घेतला,  असे ट्विट  केले आहे. शिवसेनेतून बाहेर पडणारे एकनाथ शिंदे हे एकमेव नेते नाही तर या अगोदर देखील शिवसेनेतील अनेक नेते बाहेर पडले आहे. शिवसेनेतून आतापर्यंत  बाहेर पडलेल्या बड्या नेत्यांविषयी जाणून घेऊया. 


राज ठाकरे


30 जानेवारी 2003 रोजी राज ठाकरेंच्या राजकीय आयुष्याला कलाटणी दिली ती शिवसेनेच्या महाबळेश्वर इथं झालेल्या अधिवेशनानं. याच अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. यामुळे उद्धव हेच बाळ ठाकरे आणि पर्यायानं शिवसेनेचे वारसदार आहेत यावर शिक्कामोर्तब झालं. राज ठाकरे आणि त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता. 27 नोव्हेंबर 2005 रोजी राज यांनी शिवसेना सोडली. 9 मार्च 2006 साली राज  ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली


छगन भुजबळ


 शिवसेनेने 1989मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली. 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले. मनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे छगन भुजबळांनी घेतला शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 


 नारायण राणे


नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते होते. उद्धव ठाकरेंशी मतभेद टोकाला गेल्यानंतर 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


 गणेश नाईक


नवी मुंबईतल्या बेलापूर मतदारसंघातून 1990 साली गणेश नाईक पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत दाखल झाले. पुढे 1995 साली जिंकले आणि त्याचवेळी शिवसेना-भाजप युतीची महाराष्ट्रात सत्ता आली. या काळात गणेश नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रालय आणि ठाण्याचं पालकमंत्री पद देण्यात आलं. इथेच गणेश नाईक यांच्या शिवसेनेतील नाराजीची ठिणगी पडली. मनोहर जोशी, नारायण राणे यांना बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केलं. गणेश नाईक यांनाही त्या पदाची आशा होती. पुढे गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली.  



1995 साली राज्यात युतीची सत्ता आली तेव्हा शिवसेनेत उघडउघड दोन गट होते. एकीकडे उद्धव ठाकरे, मनोहर जोशी आणि सुभाष देसाई होते. तर दुसऱ्या बाजूला राज ठाकरे, नारायण राणे आणि स्मिता ठाकरे होते.


संबंधित बातम्या :


Shivsena Leader Eknath Shinde : रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री व्हाया शाखाप्रमुख; एकनाथ शिंदेंचा संपूर्ण राजकीय प्रवास


Eknath Shinde : गुजरात मुक्कामी एकनाथ शिंदेंना पहिला 'ठाकरी' झटका ! शिवसेनेच्या गटनेतेपदावरून उचलबांगडी