Jaganmohan Reddy And Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. इतकेच नाही, तर एकनाथ शिंदे यांच्या गटानं शिवसेना पक्षावर दावा केला. हा वाद कोर्टात गेला. त्यानंतर चिन्ह आणि पक्षाचा निर्णयावरुन निवडणूक आयोगात दोन्ही गटानी कागदपत्रे सादर केली. शनिवारी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं, त्याशिवाय शिवसेना नाव वापरण्यावरही निर्बंध घातले. त्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण आलं.
पक्षचिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्यावर मनाई केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाजूनं महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सहानभुतीची लाट उसळली आहे. अशीच स्थिती आंध्रप्रदेशमध्ये पाहायला मिळाली होती. जगनमोहन रेड्डी यांच्याबाबतही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. वडिलांच्या निधनानंतर जगनमोहन रेड्डी यांना संघर्ष करावा लागला होता. नेटकरी उद्धव ठाकरे यांना सपोर्ट करताना जगनमोहन रेड्डी यांचं उदाहरण देत आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचीही भर पडली आहे. अमोल मिटकरी यांनी ‘चिन्ह गोठवलं पण मराठी माणसाचं रक्त पेटवलं’, असे ट्विट करतानाच जगनमोहन रेड्डी यांचा फोटो पोस्ट केलाय. त्याशिवाय त्यावर त्यांनी ‘बाप गेला, पक्ष गेला चिन्ह ही गेलं पण तो लढला आणि हो जिंकला सुद्धा...’ असं कमेंट्समध्ये लिहिलंय. इतके दिवस महाराष्ट्रात सोशल मीडियावर याचीच चर्चा होती. आता मिटकरी यांच्या पोस्टमुळे यामध्ये आणखी भर पडली आहे. सोशल मीडियावर जगनमोहन रेड्डी यांचा संघर्ष व्हायरल होतोय, तशीच मिळतीजुळती परिस्थिती उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात झाल्याचं नेटकरी म्हणत आहेत.. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या जगनमोहन रेड्डी यांच्या संघर्षाबद्दल जाणून घेऊयात...
2009 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. वाय.एस. जगनमोहन रेड्डी 2009 मध्ये कडप्पा लोकसभा मतदार संघातून निवडून आले होते. पण वडिलांच्या मृत्यूनंतर वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना काँग्रेसनं डावललं. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत राजकीयदृष्ट्या अडगळीत टाकलं. त्यामुळे वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेसपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला.
राजकारणात येताच वडिलांना गमावलं-
2009 मध्ये वाय एस रेड्डी यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. पण सहा महिन्यानंतरच डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. वडिलांच्या निधनानंतर काँग्रेस पक्षानं त्यांच्या मुलाकडे दुर्लक्ष केलं. कालांतरानं जगनमोहन रेड्डी आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद वाढतच गेले. त्यातच आर्थिक प्रकरणामध्ये जगनमोहन रेड्डी यांना तुरुंगवास झाला. 16 महिने तुरुंगात राहिल्यानंतरही जगममोहन रेड्डी यांनी कधीही राजकीयदृष्ट्या शरणागती पत्कारली नाही.
काँग्रेससोबत मतभेद आणि नव्या पक्षाची स्थापना -
जगनमोहन रेड्डी यांचं कुटुंब मोठ्या कालावधीपासून राजकीय क्षेत्रात आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांच्या अनेक चाहत्यांनी आत्महत्याही केली होती. त्यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी आत्महत्या करणाऱ्यांच्या कुटुंबियांच्या घरी जाऊन सांत्वन करण्यासाठी सांत्वन यात्रा सुरु केली. इथेच काँग्रेस आणि जगनमोहन रेड्डी यांच्यामध्ये वितुष्ट आलं. कारण काँग्रेसच्या हायकमांडने जगनमोहन रेड्डी यांना ही यात्रा बंद करण्याचे निर्देश दिले होते. पण जगनमोहन रेड्डी यांनी हायकमांडच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करत सांत्वन यात्रा चालू ठेवली. त्यानंतर काही दिवसानंतरच जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेससोबत फारकत घेतली. 29 नोव्हेंबर 2010 रोजी जगनमोहन रेड्डी यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच महिनाभरानंतर 45 दिवसांत नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याचं जाहीर केलं. गोदावरीमध्ये मार्च 2011 रोजी जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी पक्षाचं नाव वायएसआर काँग्रेस ठेवलं वायएसआर म्हणजे वायएस राजशेखऱ रेड्डी नव्हे तर युवजन श्रमिक रायतू काँग्रेस पार्टी होय. त्यानंतर त्यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीकडून कडप्पामधून निवडणूक लढवली. जगनमोहन रेड्डी यांनी 5,45,043 मतांनी विजय नोंदवला.
आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या विरोधासाठी प्राणांतिक उपोषण -
जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या विभाजन होऊ नये म्हणून प्राणांतिक उपोषण केलं होतं. जगनमोहन यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले होते. आंध्र प्रदेशच्या विभाजनाचा यूपीए सरकारनं निर्णय घेतला तेव्हा जगनमोहन रेड्डी तुरुंगात होते. त्यांनी तुरुंगातच प्राणांतिक उपोषण केलं. 125 तास त्यांनी प्राणांतिक उपोषण केलं. उपोषण केल्यामुळे त्यांची शुगर आणि ब्लड प्रेशर कमी झालं होतं. त्यावेळी त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्याचवेळी त्यांची आई आणि आमदार विजयम्मा यांनीही प्राणांतिक उपोषण केलं. आंध्र प्रदेश विभागणीविरोधात जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या आईने आपल्या पदाचा राजीनामा दिला. 2014 विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना 125 पैकी 67 जागांवर विजय मिळवता आले. जगनमोहन रेड्डी यांनी विरोधी पक्षाची भूमिका बजावली.
पदयात्रा ते मुख्यमंत्री -
6 नोव्हेंबर 2017 रोजी जगनमोहन रेड्डी यांनी आंध्र प्रदेशमध्ये पदयात्रा काढली. प्रजा संकल्प यात्राच्या माध्यामातून ते आंध्र प्रदेशमध्ये तीन हजार 648 किमी चालले. 430 दिवसांमध्ये 13 जिल्ह्यातील 125 विधानसभा मतदार संघात जगनमोहन रेड्डी यांनी संकल्प यात्रा काढली. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सुरु झालेली यात्रा 9 जानेवारी 2019 रोजी संपली. यावेळी आंध्र प्रदेशमधील जनतेनं जगनमोहन रेड्डी यांना साथ दिली. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं. 175 जागांपैकी 151 जागांवर त्यांनी विजय नोंदवला. त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
जगनमोहन रेड्डींचा संघर्ष आता आठवण्याचं कारण महाराष्ट्रात शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबावर आलेला कसोटीचा क्षण. या अस्तित्वाच्या लढाईत उद्धव ठाकरे कसे सामोरे जातात यावर महाराष्ट्राचं येणाऱ्या काळातलं राजकारण अवलंबून असणार आहे.