मुंबई : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात 26 जानेवारी 2020 ते 20 जानेवारी 2021 या कालावधीत तब्बल 3 कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा निर्णय
महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गोरगरीब नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने शिवभोजन ही महत्वकांक्षी योजना सुरू करण्यात आली. राज्यात 26 जानेवारी 2020 लाया योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानुसार केवळ 10 रुपयांत राज्यातील गोरगरीब नागरिकांना शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात आली. पुढे कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी शासनाने केवळ 5 रुपयांमध्ये ग्राहकांना जेवण देण्याचा महत्वकांक्षी निर्णय मार्चमध्ये घेतलेला होता. हा सवलतीचा दर जूनपर्यंत लागू करण्यात आलेला होता. मात्र अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नसल्याने पाच रुपयात शिवभोजन देण्याचा निर्णयास मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार
कष्टकरी,असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर इत्यादी नागरिकांच्या हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळी योजनेचा एप्रिलपासून तालुकास्तरावर विस्तार करण्यात आला असून प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आलेल्या शिवभोजन थाळीच्या संख्येत पाचपट वाढ करण्यात आली आहे. तसेच शिवभोजनच्या वेळेत वाढ करण्यात आली असून सकाळी 11 ते 3 या वेळेत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहरी भागासाठी प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागासाठी प्रती थाळी 30 रुपये शासन अनुदान देत आहे. तसेच राज्यात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीचा उद्दिष्टांमध्ये वाढ करून अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचवण्याचा आमचा प्रयत्न आहे असे मत देखील भुजबळ यांनी व्यक्त केले
शासनाने शिवभोजन योजना सुरु केल्यानंतर जानेवारी महिन्यात 79 हजार 918 फेब्रुवारी महिन्यात 4 लाख 67 हजार 869, मार्च महिन्यात 5 लाख 78 हजार 31 नागरिकांनी आस्वाद घेतला. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने घोषित केलेल्या लॉकडाऊन मधील एप्रिल, मे आणि जून या महिन्यात अनुक्रमे 24 लाख 99 हजार 257, 33 लाख 84 हजार 40, 30 लाख 96 हजार 232 इतक्या लोकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.
लॉकडाऊननंतरच्या काळात जुलै महिन्यात ३० लाख ३ हजार ४७४, ऑगस्ट महिन्यात ३० लाख ६० हजार ३१९, सप्टेंबर महिन्यात ३० लाख ५९ हजार १७६,ऑक्टोबर ३१ लाख ४५ हजार ०६३, नोव्हेंबर २८ लाख ९६ हजार १३०, डिसेंबर मध्ये २८ लाख ६५ हजार ९४३ तर आज २० जानेवारी २०२१ पर्यंत १९ लाख २६ हजार ०५४ गरजू नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला असून आज शिवभोजन थाळी वाटपाचा विक्रम झाला असून आजपर्यंत तब्बल तीन कोटी नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला आहे.
राज्यातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या या शिवभोजन थाळी योजनेचा असाच वाढता प्रतिसाद राज्य शासनास प्रेरणादायी आहे, तसेच राज्यातील गरीब,मजूर आणि कामगार वर्गाला या योजनेचा फायदा होत असल्यामुळे छगन भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले आहे.