चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरोधात प्रशासन सुस्त आणि राजकीय कार्यकर्ते सुसाट असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी आज अन्न व औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सोबत नेऊन मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू पकडून दिला आहे.


चंद्रपूर शहरातील गंज वॉर्ड परिसरात एका गोडाऊनवर मारण्यात आलेल्या छाप्यात 32 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काल रात्रीच आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर शहराजवळ असलेल्या पडोली भागात दारू तस्करी करणाऱ्या सहा गाड्या पकडून दिल्या होत्या. आमदार जोरगेवार यांनी काल रात्री पकडलेल्या 6 बोलेरो पिक अप गाड्यांमध्ये 1589 पेट्या देशी दारू आढळून आली आहे. या दारूची किंमत अंदाजे 75 लाख असून पकडण्यात आलेल्या गाड्यांची किंमत मिळून 1 कोटी 18 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध धंद्यांविरोधात पोलीस आणि प्रशासनाच्या कारवाया पूर्णपणे थंडावल्याची कुजबुज सुरु आहे. त्यातच आमदार जोरगेवार यांनी रस्त्यावर दारू तस्करी करणाऱ्या सहा गाड्या पकडल्याने तर पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीत सामील असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.


संबंधित बातम्या :