Mumbai–Nagpur Expressway: नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा केवळ महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांना जोडणारा रस्ता नाही किंवा मुंबई ते नागपूर हे सातशे एक किलोमीटर अंतर अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचणार एवढेच या महामार्गाचे महत्त्व नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अर्थपूर्ण रीतीने जोडला जाणार हे त्याचे महत्त्व आहे. दहा जिल्ह्यांमधून जाणारा समृद्धी महामार्ग हा मराठवाडा विदर्भ आणि खानदेश येथील जनजीवनात समृद्धी आणणारा महामार्ग असेल असं स्वप्न विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांचं होतं. देशमुखांनीच मुख्यमंत्री असताना या महामार्गाची कल्पना पहिल्यांदा मांडली आणि ती देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रत्यक्षात आणली. 


महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी या महामार्गाचे 16 उपविभागात भाग करून कामाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी कोणत्याही गावाला शहराला या महामार्गाची अडचण ठरू नये, यासाठी याचा मार्ग माळावरून, गावाला वळसा घालून कशाप्रकारे तयार होऊ शकेल याची चाचपणी करण्यात आली होती.  ज्यावेळी जमीन हस्तांतरणाचा मु्द्दा आला त्यावेळी नगर नाशिक बुलढाणा येथील शेतकऱ्यांनी याला विरोध केला होता. त्यांचं म्हणणं होतं की विकास प्रकल्प होतो आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्त मात्र शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवत राहतो. परंतु तत्कालीन सरकारने 24 तासांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसच्या माध्यमातून मोबदल्याचे पैसे जमा केले आणि त्यामुळे शेतकरी विरोध मावळल्यांचं पाहिला मिळालं. जमीन हस्तांतरित तर झाली होती मात्र एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी पैसा कसा उभा करायचा? हा सरकारसमोर प्रश्न होता त्यावेळी तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लँड सेक्युरी डायजेशनची संकल्पना मांडली. याअंतर्गत शासनाची नेपेन सी रोड ची जागा, वांद्रे येथील जागा, कप परेड येथील जागा एमएसआरडीसीच्या नावे करण्यात आली आणि याची तब्बल किंमत पन्नास हजार कोटी रुपये इतकी निश्चित करण्यात आली. 


लँड सिक्युरिटायझेशन म्हणजे काय? 
सरकारने त्यांच्याकडे असलेली जमीन बँकांकडे सेक्युरिटायझ करायची आणि त्या मोबदल्यात बँकांनी वीस ते पंचवीस हजार कोटी रुपयांची रक्कम सरकारला द्यायची. ही जमीन केवळ तारण हमी म्हणून बँकांकडे राहील मात्र प्रत्यक्ष ताबा हा सरकारकडेच राहील असं ठरवण्यात आलं.


महामार्गाचं नाव समृद्धी कसं पडलं?
महामार्गाचं समृद्धी असं नाव पडण्यामागे देखील एक कथा आहे. सुरुवातीला या महामार्गाचे नाव कम्युनिकेशन सुपर एक्सप्रेस वे असं करण्यात आलं होतं. परंतु या महामार्गामुळे महाराष्ट्रात समृद्धी येणार, शेती व्यवसायाला फायदा होणार, नाशिक पुणे यांच्याबरोबरच आता विदर्भातला शेतीमाल देखील मुंबईत पोहोचणार आणि यामुळे देशात समृद्धी येणार म्हणून या महामार्गाचे नाव समृद्धी महामार्ग असं करण्यात आलं. या महामार्गामुळे अनेक पर्यटन स्थळं परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे आपोआपच पर्यटनाला चालना मिळेल. यामध्ये प्रामुख्याने लोणारचं सरोवर, वेरूळ अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव ,सेवाग्राम, शिर्डी दौलताबादचा किल्ला बीबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळं महामार्गाच्या नजीक येणार आहेत. 


समृध्दी महामार्गाची वैशिष्ट्य -
1) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे.


2) कमाल गती घाटात प्रतितास शंभर किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर 150 किलोमीटर आहे.  


3) नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक आठ तासात आणि मालवाहतूक 16 तासात शक्य होईल. 


4) राज्याच्या पाच महसूल विभागांच्या दहा जिल्ह्यातील 26 तालुक्यांमधील 392 गावांमधून जाणारा हा सहा पदरी महामार्ग


5) महाराष्ट्रातील दूरवरचे जिल्हे मुंबईतील बंदरातून आणि नागपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जगभरात व्यापार करू शकतील


6) नागपूर मधील मिहान शी अनेक जिल्हे जोडले जाणार


7) हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी सिद्ध


समृद्धी महामार्ग विकासाचं चित्र बदलणार?


समृद्धी महामार्गावर टोलनाक्यांमुळे वाहनांची गती रोखते असा अनुभव आहे, हे लक्षात घेऊन नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गावर कुठल्याही प्रकारचे टोलनाके असणार नाहीत. मात्र या संपूर्ण प्रवासामध्ये ज्या शहरांसाठी आगमन निर्गमन द्वारे आहेत. त्या ठिकाणी टोलनाके तयार करण्यात आले आहेत, असे एकूण 24 टोल नाके असणार आहेत. महामार्गावर अठरा ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे.या ठिकाणी शेतीला पूरक उद्योग असतील औद्योगिक उत्पादनासाठी काही भूखंड राखीव असणार आहेत. एका कृषी समृद्धी केंद्रात तीस ते साठ हजार प्रत्यक्ष रोजगार संधी निर्माण होणार आहेत. भविष्यकाळात 15 ते 20 लाख नवीन रोजगार संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. कसारा घाटात कायम वाहतूक समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळतं, मात्र आता देशातील सर्वात रुंद म्हणून ओळखले जाणारे दोन बोगदे इगतपुरी जवळील कसारा घाटात करण्यात आले आहेत. सध्या कसारा घाट पार करण्यासाठी 35 मिनिटे लागतात, आता या बोगद्यामुळे अवघ्या पाच मिनिटात कसारा घाट पार करता येणार आहे. आणि यामुळे सातत्याने ट्राफिक समस्येचा सामना करावा लागणाऱ्या प्रवाशांना यातून सुटका मिळणार आहे. या बोगद्याची लांबी तब्बल आठ किलोमीटर असून रुंदी 17.5 मीटर इतकी आहे. समृद्धी महामार्ग काही भागात अभयारण्यातून देखील जातो यामध्ये तानसा अभयारण्याचा समावेश आहे .या ठिकाणी असणाऱ्या प्राण्यांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ नये यासाठी अभयारण्यामध्ये ध्वनी रोधक यंत्रणा बसवण्यात आली आहे. यासोबतच कोणताही प्राणी महामार्गावर येऊ नये यासाठी महामार्गाच्या खालून बोगदे देखील तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे जंगलातील प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असा दावा सरकारच्या वतीने करण्यात येत आहे. गेली सहा दशक उलटून गेली तरी विकास रेखा पुणे मुंबई नाशिक या सुवर्ण त्रिकोणाच्या पलीकडे सहसा सरकली नाही. मात्र समृद्धी महामार्ग आता हे चित्र बदलेल अशी अपेक्षा सर्वांचीच आहे.