Grampanchayat Election : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची (Grampanchayat Election) रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळं उमेदवारांची धावपळ सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल (2 डिसेंबर) शेवटचा दिवस होता. दिवसभरात अनेकांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काही ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायचे शिल्लक राहिल्यानं रात्री नऊ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंत उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. दरम्यान, शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडल्याचे पाहायला मिळालं. मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येनं उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती...

  


सिंधुदुर्ग जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीची निवडणूक 


सिंधुदुर्ग  जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत सरपंच पदासाठी 1 हजार 149 तर सदस्यपदासाठी 5 हजार 517 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे. अर्ज भरण्याची काल शेवटचा दिवस होता. पाच डिसेंबरपर्यत अर्ज छाननी आणि सात डिसेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. सिंधुदुर्गात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची ग्रामपंचायत निवडणुकीत युती आहे. तर महाविकास आघाडीचे अजूनही काही ठरलं नाही. त्यामुळं जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती कुणाकडे जाणार हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.


यवतमाळ जिल्ह्यात 100  ग्रामपंचायतीची निवडणूक होणार


यवतमाळ जिल्ह्यात 100  ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये 776 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण 1 हजार 715 तर सरपंच पदाच्या 100 जागांसाठी एकूण 385 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल शेवटच्या दिवशी अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला  आहे. जिल्ह्यातील 100 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला  मतदान होणार आहे. अर्ज दाखल करण्याची काल शेवटची मुदत असल्याने जिल्हाभरातील सर्वच तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. 



अहमदनगर जिल्ह्यात 203 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक


अहमदनगर जिल्हयातील 203 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. सरपंच पदासाठी एकूण 1282 तर सदस्य पदासाठी एकूण 7 हजार 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. काल अर्ज भरण्याच्या अखेरच्या‌ दिवशी इच्छुकांची मोठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळालं. अहमदनगर जिल्ह्यात अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली  आहे. काही गावांमध्ये गावकीच्या राजकारणामुळं एकाच नेत्याचे दोन पॅनेल एकमेकांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.



जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतीची निवडणूक


जळगाव जिल्ह्यात 140 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये 1 हजार 208 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी एकूण 3 हजार 274 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सरपंच पदाच्या 140 जागांसाठी एकूण 671 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अर्जांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत असल्याने जिल्हाभरातील सर्वच तहसील कार्यालयांमध्ये मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील 140 ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या आहेत. यात अंमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे, निमझरी या  दोन तसेच पारोळा तालुक्यातील सावखेड मराठ, जळगाव तालुक्यातील सुजदे व सावखेडा आणि रावेर तालुक्यातील अटवाडे या सहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.


बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतींची निवडणूक



बीड जिल्ह्यात 704 ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरु आहे. जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतसाठी 24 हजार 77 अर्ज दाखल झाले आहेत. यात सरपंच पदासाठी 4 हजार 216 तर सदस्य पदासाठी 19 हजार 681 इच्छुकांनी आपले अर्ज सादर केले आहेत. बीड जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली. साडेपाच वाजल्यानंतर देखील उमेदवारी अर्ज भरायचे शिल्लक राहिल्याने रात्री नऊ वाजेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले होते. कमी कालावधी राहिल्याने उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती.
 


वाशिम जिल्ह्यात 287 ग्रामपंचायतींची निवडणूक


वाशिम जिल्ह्यातील  287 ग्रामपंचायतीची निवडणूक लागली आहे. यासाठी हजारो नामांकन अर्ज दाखल झाले  वाशिम जिल्ह्यातील 287 ग्राम पंचायतीतील 872 प्रभागातून 2372 सदस्य पदासाठी 5447 अर्ज दाखल झाले आहेत. तर 287 सरपंच पदासाठी 1439 अर्ज दाखल झाले आहेत.


धुळे जिल्ह्यात 128 ग्रामपंचायतींची निवडणूक 


धुळे जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील 128 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी 446 तर सदस्य पदासाठी तब्बल 2 हजार 322 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. 451 प्रभागातून 1 हजार 212 सदस्यांची आणि 128 सरपंचांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत धुळे तालुक्यातील 33, साक्री तालुक्यातील 55, शिंदखेडा तालुक्यातील 23 तर शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 


हिंगोली जिल्ह्यात 63 ग्रामपंचायतींची निवडणूक


हिंगोली जिल्ह्यातील ६3 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे.  उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. जिल्ह्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी 91 तर सदस्य पदासाठी 431 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल, वेळ संपल्यानंतरही अनेक ठिकाणी उमेदवारांची गर्दी