मुंबई : कोरोना महामारीने सर्वाधिक फटका महाराष्ट्राला (Maharashtra Coronavirus Update) बसला आहे. कोरोना परतीच्या वाटेवर आहे असे वाटत असतानाच पुन्हा एकदा आकडेवारीने धडकी भरवली आहे. रविवारी गेल्या तीन महिन्यातील सर्वाधिक बाधित राज्यात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. दिवसागणिक राज्यामध्ये केसेस वाढल्याचे दिसून येत आहे. राज्यात रविवारी नव्या 550 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. गेल्या चार दिवसांपासून पाचशेवर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मागील चार दिवसांमध्ये बाधितांचा आकडा २ हजारांवर गेला आहे.  


राजधानी मुंबईत कोरोनाबाधितांमध्ये १४ टक्क्यांनी वाढ 


राजधानी मुंबईमध्ये शनिवारी कोरोनाचे नव्याने 375 बाधित आढळून आले. मुंबईत कोरोनाबाधितांमध्ये 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात रविवारी एकाचा मृत्यू झाला. 


रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली 


यापूर्वी राज्यात एक मार्च रोजी कोरोनाचे सर्वाधिक बाधित (675) आढळले होते. दुसरीकडे मुंबईमध्ये तब्बल 108दिवसांनी कोरोनाच्या दैनंदिन बाधितांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबईमधील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार, तर राज्यातील एकूण संख्या 2 हजार 997 झाली आहे. गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दोन आकड्यांमध्ये गेली आहे. रविवारी 17 बाधित रुग्णालयात दाखल झाले. सेव्हन हिल्स डेप्युटी डीन डॉ. स्मिता चव्हाण यांनी यांनी सांगितले की, 25 कोरोना वॉर्डमध्ये, तर 10 आयसीयू वॉर्डमध्ये दाखल आहेत. अर्थात ही संख्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत नगण्य आहे. 


देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर


देशातील कोरोना संसर्गातील चढउतार कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 706 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 25 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या आधीच्या दिवसाच्या तुलनेत घसरल्याचे दिसून येत आहे. नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट झाली आहे. त्याआधीच्या दिवशी 2828 नवे कोरोना रुग्ण आणि 14 जणांचा मृत्यू झाला. देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात 17 हजार 698 इतके कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. 


देशात रविवारी दिवसभरात म्हणजेच गेल्या 24 तासांत 2 हजार 70 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. यामुळे देशात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4, कोटी 26 लाख 13 हजार 440 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या 25 नवीन मृत्यूंसह कोरोना बळींची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे 5 लाख 24 हजार 611 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.