Maharashtra Politics : शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. अर्जुन खोतकर यांनी प्रामाणिकपणे खरं कारण देत आपल्या  निर्णयावर भाष्य केले असल्याचे राऊत यांनी सांगितले. आपल्या भूमिकेसाठी त्यांनी हिंदुत्वाला बदनाम केले नाही, असेही राऊत यांनी म्हटले. 


काही दिवसांपूर्वी अर्जुन खोतकर यांनी दिल्लीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांनतर केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचीही भेट घेतली होती. मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर खोतकर हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू झाली. शिंदे गटाकडून हा दावाही करण्यात आला. मात्र, खोतकर यांनी आपण शिवसेनेत असून लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खोतकर यांनी दानवे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी खोतकर यांनी आपण कठीण काळात सुरक्षित राहण्यासाठी काही निर्णय घेत असल्याचे सांगितले. 


संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी सांगितले की, अर्जुन खोतकर हे जुने सहकारी आहेत. त्यांनी माध्यमांसमोर कोणत्या तणावात आहोत हे सांगितले. कुटुंबीयांवर आणि त्यांच्यावर कोणता दबाव आहे हेदेखील स्पष्टपणे सांगितले. कठीण काळात सुरक्षित होण्यासाठी पावले उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. खोतकर यांनी हिंदुत्वलाला बदनाम केले नाही, यासाठी अभिनंदन करतो असे राऊत यांनी म्हटले. 


तुरुंगात जाण्याची तयारी, गुडघे टेकणार नाही


ईडीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाबाबत कोणतीही टिप्पणी करणार नाही. ईडीला काळापैसा, ड्रग्ज माफिया, दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार दिलेत. पण, त्यांचा वापर राजकीय विरोधकांविरोधात होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. त्याच हेतूने सोनिया गांधी, राहुल गांधी, संजय राऊत, अनिल देशमुख यांची ईडी चौकशी सुरू असल्याचे राऊत यांनी म्हटले. 


जर खोट्या प्रकरणात अडकवून मला अटक करणार असतील तर तुरुंगात जाण्यास तयार आहे. पण मी गुडघे ही टेकणार नाही असा निर्धारही राऊत यांनी व्यक्त केला.  आपण ईडीच्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार आहोत. शिवसेनेला बळ मिळणार असेल तर मी कारवाईसाठी तयार आहे. शिवसेनेसाठी अनेकांनी त्याग केला आहे. मलाही राजकीय हेतूने होणाऱ्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्यास माझी तयारी आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.