Rang Panchami Live Updates : तुळजाभवानी मंदिरात रंगपंचमी साजरी, विविध प्रकारच्या 17 रंगांची उधळण

Rang Panchami : आज रंगपंचमी आहे. या दिवसाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Mar 2023 02:41 PM
नाशिकमध्ये सकाळपासूनच रंगांची उधळण
Rang Panchami :  आज रंगपंचमी आहे. नाशिकमध्ये सकाळपासूनच रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जात असून रंगप्रेमींमध्ये मोठा उत्साह दिसून येतो आहे. कॉलेज रोडवरील कृषीनगर जॉगिंग ट्रॅकबाहेर जॉगिंग होताच जोगर्स गाणे म्हणत आहेत. एकमेकांना रंग लावत कोरडी रंगपंचमी साजरी केली. अगदी 40 ते 76 वयोगटातील मंडळी यात सहभागी होते. 
Rang Panchami :  जेजुरीगड आणि कडेपठार गडावरील खंडोबा मंदिरात रंगपंचमी साजरी





Rang Panchami :  महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरीगड आणि  कडेपठार गडारील मंदिरात धार्मिक वातावरणात आणि उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. रंग पंचमीनिमित्त दोन्ही गडावरील श्री खंडोबा मंदिरात पहाटे विविध रंगांचे पंचामृत तयार करून देवाला रंगांचा अभिषेक घालण्यात आला. पूजा व आरती नंतर श्री मार्तंड भैरव, श्री खंडोबा व म्हाळसा व बानुबाई यांच्या मूर्ती व स्वयंभू शिवलिंगाना विविध रंग लावून रंगपंचमी अतिशय धार्मिक वातावरणात व उत्साहात साजरी करण्यात आली.


 

 



 


Rang Panchami : तुळजाभवानी मातेच्या मंदिरात रंगपंचमी साजरी, विविध प्रकारच्या 17 रंगांची उधळण

Rang Panchami :  तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज रंगपंचमी सणं विविध 17 प्रकारच्या रंगांची उधळण करीत साजरा करण्यात आला. यावेळी तुळजाभवानी देवीला रंग लावण्यात आले. विशेष म्हणजे तुळजाभवानी देवीला आज भाताचा नैवैद्य अर्पण करण्यात आला. तोही विविध रंगाचा असतो. तसेच देवीचे पारंपरिक अलंकारासह खोबऱ्याचा हार घालण्यात आला. देवीचे महंत, पुजारी यांनी तुळजाभवानी देवीला रंग लावत गाभाऱ्यात रंगाची उधळण केली त्यानंतर तुळजापूर शहरात रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळी नैसर्गिक कोरडे रंग वापरण्यात आले.तत्पूर्वी देवीचे विविध अलंकार घालून पूजा करण्यात आली त्यानंतर रंगांची उधळण केली

Rang Panchami : अवघा रंग एक झाला, पंढरीत रंगपंचमीची धूम  

Rang Panchami : पंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो . जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे. या संपूर्ण कालावधीत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र परिधान करून त्यावर रोज नैसर्गिक रंगाची उधळण होत असते. याच सोहळ्याचा आज अंतिम दिवस अर्थात रंगपंचमी. त्यामुळं या सोहळ्याचा अनोखा उत्सव पंढरपूर शहरात झाला. आज येथील यमाई ट्रॅकवर शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी नैसर्गिक रंगाची मुक्तहस्ते उधळण करीत रंगपंचमी साजरी केली. यावेळी डीजेच्या तालावर शेकडोच्या संख्येने तरुण तरुणींनी बेधुंद होत ठेका धरला. त्यामुळं आज अक्षरश अबाल वृद्ध या सोहळ्यात सामील झाले होते. यावेळी संपूर्ण पर्यावरण पूरक रंगाची कोरड्या रंगांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.

पार्श्वभूमी

Rang Panchami Live Updates :  आज रंगपंचमी आहे. या दिवसाचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. धूलिवंदनापासून सुरु होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. या पाचव्या दिवशी रंग खेळून रंगपंचमी साजरी करतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. रंगपंचमीच्या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून सण साजरा करतात, आनंदोत्सव करतात. 

 

रंगपंचमी म्हणजेच रंगांचा सण. हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे. रंगपंचमी हा सण फाल्गुन कृष्णपक्ष पंचमीला साजरा केला जातो. म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगांची उधळण करत रंगीबेरंगी रंगात न्हाऊन मोठ्या धूम धडाक्यात हा सण साजरा केला जातो. धूलिवंदनापासून वसंतोत्सव सुरु होतो. धूलिवंदनानंतर पाचव्या दिवशी रंगपंचमी सण साजरा केला जातो.







 

रंगपंचमी सण का साजरा करतात?








रंगपंचमी हा सण वसंत ऋतूशी संबंधित महत्त्वाचा सण आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला हा सण साजरा केला जातो. भगवान कृष्ण द्वापार युगात त्यांच्या संवंगड्यावर उन्हाची रखरख कमी करण्यासाठी पाणी उडवायचे. हीच प्रथा रंगपंचमी म्हणून साजरी करण्यात येते. उन्हाचा तडाखा कमी व्हावा आणि थंडावा मिळावा यासाठी एकमेकांच्या अंगावर पाणी उडविण्याची प्रथा चालत आली आहे. आजतागायत ही प्रथा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. देशाच्या कानाकोपऱ्यात हा सण वेगवेगळ्या प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.


देशभरात रंगपंचमीचा उत्साह 


देशभर आज रंगपंचमीचा सण उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र हा सण होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो.  


साताऱ्यातील प्रसिद्ध बगाड यात्रा


महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देशभर प्रसिद्ध आहे. रंगपंचमीच्या दिवशी बगाड यात्रा (Bagad Yatra) मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. बावधनची यात्रा म्हणजे, देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा. या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी या दोन्ही भगिनींना आणलं जातं, अशी या भक्तांची भावना आहे. 


कोकणातही रंगपंचमीचा सण 


सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावच्या हुडोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. दरवर्षी भाविकांच्या अलोट गर्दीत साजरा होणारा 'हुडोत्सव सर्वांसाठी पर्वणीच असते. हा हुडा सागवानी लाकडाचा बनविण्यात आला आहे. घोडेमोडणी हे या हुडोत्सवाचे वेगळेपण आहे. कोलगांव, कुणकेरी, आंबेगावचं रोंबाट होळीच्या सातव्या दिवशी श्रीदेवी भावई, आवेगावचा श्रीदेव क्षेत्रपाल, कोलगांवचा श्रीदेव कलेश्वर हुडोत्सवात सहभागी होतात. तर तीन अवसार या हुड्यावर चढतात, यावेळी खाली जमलेल्या भक्तगणांच्या अफाट गर्दीतून या अवसारावर दगड मारण्याची प्रथा आहे.


सोलापुरात रंगपंचमीचा रंगगाडा उत्सव 


सोलापुरात आज रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळेल. लोधी समाजाचा पारंपारिक उत्सव असलेल्या रंगपंचमीचा रंगगाडा उत्सव आज साजरा होईल. मागील दोन वर्षात कोरोनामुळे हा उत्सव साजरा झालेला नव्हता. यंदा मोठ्या उत्साहात लोधी समाज हा उत्सव साजरा करणार आहे. पारंपारिक पद्धतीने शंभर बैलगाड्यांवर रंगाचे आणि पाण्याचे बॅरल ठेवण्यात येतात. शहरातील विविध भागातून या बैलगाड्यांची मिरवणूक निघते. दुपारी 4 वाजता बालाजी मंदिर येथून या रंगगाड्या निघतील.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.