Maharashtra Rains Live Updates : राज्यात पावसानं घेतली विश्रांती, जुलै महिन्यात चांगला पाऊस
Maharashtra Rains Live Updates : राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
Washim Rain : वाशीम शहराला पाणी पुरवठा करणारा एकबुर्जी प्रकल्प गेल्या 25 दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळं 100 टक्के भरला आहे. त्यामुळं वाशिमकरांची पुढच्या वर्षभराची चिंता मिटली आहे. प्रकल्प तुडुंब भरल्यानं सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानं सांडव्याला धबधब्यांचं रुप प्राप्त झालं आहे. पर्यटकांना धबधबे आकर्षित करत आहेत. मात्र, अनुचित प्रकार घडू नये, जीवितहानी होऊ नये याकरता प्रशासनानं धरण क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
Yavatmal Rain : नऊ वर्षांनंतर यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. इसापूर धरणात पाणीसाठा वाढल्याने गेट क्रमांक 6 आणि 10 हे दोन गेट 30 सेंटीमिटरने उघडण्यात आले. पैनगंगा नदी पात्रात 6 हजार 768 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तब्बल 9 वर्षांनंतर जुलै महिन्यात धरणाचे दरवाजे उघडावे लागले. जिल्ह्यातील इसापूर धरण यवतमाळ, हिंगोली व नांदेड जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असून तीन जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येते. चालू वर्षात 1 जूनपासून आजपर्यंत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 734 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वी 24 जुलै 2013 मध्ये दोन दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता.
पार्श्वभूमी
Maharashtra Rains Live Updates : आठवडाभर राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्यानंतर सध्या पावसाचा जोर कमी झाला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. साताऱ्यासह सांगली आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं विश्रांती घेतली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे.
साताऱ्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी
सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी मुसळधार पाऊस झाला. या पावसाचा मोठा शेतकऱ्यांना बसला आहे. शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालं आहे. वाई कवठेमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं होतं. या भागातील कवठे गावच्या हद्दीतील महामार्गावरील सर्विस रोडवर पाणी साठले होतं. हे पाणी सर्विस रोडवर शेजारी असलेल्या काही घरांमध्ये देखील शिरले. तसेच पावसाचं पाणी काही दुकानांमध्येही शिरल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर काही घरात पाणी शिरल्याने लोकं पाण्यात अडकली होती. दरम्यान, सध्या पावसाचा जोर थोडा कमी झाला आहे. त्यामुळं पाणी ओसरलं आहे.
विश्रांतीनंतर काल हिंगोली जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळं जिल्ह्यातील अनेक लहान मोठे ओढे भरुन वाहत आहेत. तर पाणीपुरवठा करणाऱ्या प्रकल्पांच्या पाणी पातळीसुद्धा मोठी वाढ होताना दिसत आहे. या पावसामुळे शेतातील पिकांना सुद्धा नवचैतन्य मिळत आहे. जोरदार सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.
कोकणातही पावसाची दडी
कोकणातही पावसानं दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसापासून कोकणात पावसानं विश्रांती घेतली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या पाच तालुक्यात गेल्या आठ दिवसात शून्य टक्के पावसाची नोंद झाली आहे. आठ दिवसापासून जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकरी पावसाची वाट भगत आहेत. कारण पिक चांगलं येण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची गरज आहे. श्रावण सारख्या नयनरम्य महिन्याला सुरुवात झाली आहे. शिवाय सृष्टीही हिरव्या शालूत खुलून दिसत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला कोसळणाऱ्या पावसाच्या सरी गेल्या आठवड्यापासून कमी बरसू लागल्या आहेत.
जुलै महिन्यात चांगला पाऊस
जून महिन्यात पावसानं हुलकावणी दिली होती. त्यानंतर मात्र, जुलै महिन्यात राज्यांच्या बहुतांश भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कलीत झालं होते. नदी नाल्यांना पूर आल्यानं शेतीचंही मोठं नुकसान झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी रत्यांचही मोठं नुकसान झालं आहे. त्याचा वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राला या पावसाचा फटका बसला आहे. सध्या विविध ठिकाणी पंचनामे सुरु असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -