Heavy Rain Forecast For These States : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं (Maharashtra Rain Updates) पुन्हा एकदा बरसण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी उकाड्यानं अंगाची लाही लाही होत होती. अशातच पुन्हा एकदा वरुणराजानं कृपा करत बरसण्यास सुरुवात केल्यानं अनेक राज्यांत उकाड्यापासून सुटका झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतीय हवामान खात्यानं गुजरात (Gujrat), महाराष्ट्र (Maharashtra), पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं की, या महिन्याच्या 17 आणि 18 तारखेच्या सुमारास बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओदिशामध्ये अत्यंत मुसळधार पाऊस कोसळू शकतो. त्यासह इतर राज्यांतही हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे.
ओदिशात पावसाची कोसळधार
हवामान खात्याच्या या इशाऱ्यानंतर ओदिशा सरकारनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितलं आहे. हवामान खात्यानं मच्छिमारांना उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरापासून आणि आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून समुद्रात जाऊ नये, कारण या कालावधीत समुद्राची स्थिती खराब राहण्याची शक्यता आहे. ओदिशातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
महाराष्ट्रातही पावसाचा तडाखा
हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, दक्षिण ओदिशाच्या किनारपट्टीभागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाडा भागात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पुण्यात रविवारीच सलग तीन-चार तास पावसानं हजेरी लावल्यानं नागरिकांचे हाल झाले. सोमवारीही अनेक शहरांमध्ये पावसाने हजेरी लावली.
शिर्डीत मुसळधार पाऊस
शिर्डीसह परिसरात मुसळधार पाऊस बरसत आहे. काल संध्याकाळपासून शिर्डीत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राहता, कोपरगाव, शिर्डी, बाभलेश्वर परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
बुलढाण्यात पावसाची संततधार
बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून अनेक भागांत पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झालं असून नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्यामुळे शेतकऱ्यांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
वर्ध्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार
वर्धा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. ग्रामीण भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावाला पाण्याचा वेढा आहे. 2 ते 3 फूट पुराच्या पाण्यातून नागरिकांना महत्वाच्या कामासाठी वाट काढावी लागत आहे. तर वर्धमनेरी-आर्वी मार्ग बंद झाला आहे. तसेच चानकी-भगवा मार्ग बंद झाला आहे. अनेक शेतात पुन्हा पाणी साचल्याच पाहायला मिळत आहे.
कोणत्या भागात ऑरेंज आणि यलो अलर्ट?
हवामान विभागाच्या माहितीनुसार कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरासाठी पुढील पाच दिवस पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसाठी आजपासून पुढील तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पुढील तीन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात पुढील दोन दिवस सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच इतर ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नांदेड आणि हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं आज मराठावाड्यासाठी देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.