मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू


दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी  बोलवली आज बैठक 


दसरा मेळाव्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज बैठक बोलवली आहे. बैठकीला सर्व मंत्री, आमदार नेते उपनेते आणि युवा सेना पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. दसरा मेळावा कुठे आणि कसा करायचा यावर चर्चा होणार आहे. 


एमसीएची आज वार्षिक सर्वसाधारण सभा 


एमसीएची आज वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत शरद पवार, आशिष शेलार, आदित्य ठाकरे यांच्यासह इतर सदस्या उपस्थित राहणार आहे.


विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा


विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधारेचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कोकणात पुढील पाच दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. वाऱ्यांचा वेग अधिक असल्यानं समुद्र खवळलेला असणार आहे अशात मच्छिमारांना पुढील 2 दिवस अरबी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.


 सुप्रीम कोर्टात बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी 


 सुप्रीम कोर्टात बीसीसीआयच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. या याचिकेत बीसीसीआयने आपल्या संविधानात काही बदलांची परवानगी मागितली आहे. कोर्टाने बीसीसीआयची याचिका मान्य केली तर अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांचा कार्यकाळ वाढवता येणार आहे.


श्रीकृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशिदीच्या वादावर आज सुनावणी


मथुरेच्या न्यायलयात आज श्रीकृष्ण जन्मभूमी शाही इदगाह मशिदीच्या वादावर आज सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणी दरम्यान कोर्टाने आज पर्यंतची स्थगिती दिली होती.


पृथ्वीला विशाल लघुग्रह धडकणार?


 एक मोठा लघुग्रह (एस्टेरॉयड) पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. हा लघुग्रह पृथ्वीला धडक देऊ शकतो असं वैज्ञिनिकांच म्हण आहे. मात्र हा ग्रह पृथ्वीच्या वातावरणात येण्याची शक्यता कमी आहे. या ग्रहाला 2008 RE असं नावं आहे. साधारण 3 ते 4 वर्षातून एकदा असा ग्रह पृथ्वीच्या दिशेने येत असतो. हा ग्रह आतापर्यंतच्या ग्रहापेक्षा पृथ्वीच्या जास्त जवळ आहे. 13 सप्टेंबरला 1.50 मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. साधारण 10 किलोमिटर प्रति तास असा वेग आहे.