Rain Update :  'सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ? शाळेभोवती तळे साचून सुटटी मिळेल काय?' भरपूर पाऊस यावा अन् शाळेला सुट्टी मिळावी. बहुदा शाळेत असणाऱ्या प्रत्येक बालगोपाळांच्या मनातली ही भावना होय..  हे गाणं आपण सर्वांनीच लहानपणी वाचलंय... गायलंय... आणि ऐकलेयही... भोलानाथनं पुण्यासह चार ते पाच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं गाऱ्हाणं ऐकलेलं दिसतंय. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परिणामी पुण्यासह चार जिल्ह्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही ठिकाणी परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे. 


आठवडाभरापासून राज्यात राज्यात पावसाने थैमान घातले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आले आहेत. तर काही ठिकाणी रस्तेही वाहून गेल्याची स्थिती आहे. काही गावांचा संपर्कही तुटला आहे. पुढील काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे.  त्यामुळे खबरदारी म्हणून पुणे, पिंपरी चिंचवड, रायगड, नांदेड आणि पालघरमध्ये शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अतिमुसळधार पाऊस पडलेल्या ठिकाणी शाळा बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. 


पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये शाळांना सुट्टी -
मुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद राहणार आहेत. पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणी साचतंय. त्यामुळे आज दुपारपासून उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर पालिकेकडून हा निर्णय घेण्यात आला


रायगडमध्येही शाळा बंद -
तिकडे रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली. ज्याठिकाणी मुसळधार पाऊस असेल, तिथे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


नांदेडमध्ये शाळा बंद ठेवण्याचा निर्णय -
गेल्या चार दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नांदेड जिल्ह्यात  गेल्या 24 तासात सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकुण 510.30 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे पूरपरिस्थिती पाहता जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


पालघरमध्ये रेड अलर्ट, शाळांना सुट्टी -
पालघर जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यात आत्तापर्यंत पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. 


यवतमाळमध्ये काय स्थिती?
उमरखेड तालुक्यातील सर्व शाळा व कॉलेज आज 13 जुलै रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. संततधार पाऊसामुळे आपत्ती टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आदेश दिला होता.    संततधार पाऊसामुळे संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी उमरखेड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा, कॉलेज (शासकिय, निमशाकिय)  13 जुलै 2022 रोजी एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. उद्याच्या शाळाबाबत पावसाची स्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार आहे.