Pune-Lonavala News: लोणावळ्यात संध्याकाळी पाचनंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे. शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळं पर्यटकांना धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागत आहे. भुशी धरण इतकं ओसंडून वाहतंय की पायऱ्या ही दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्याला जायचा बेत आखत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे.
लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच आहे. दहा तासांतच 125 मिलिमिटर इतका पाऊस कोसळलाय. काल सकाळी सात ते सायंकाळी पाच पर्यंतची ही आकडेवारी आहे. गेल्या सात दिवसांत धो धो बरसत पावसाने तब्बल 1077 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
पर्यटक दरवर्षी लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो होण्याची वाट बघत असतात. पुरेसा पाऊस झाला की भुशी धरण ओव्हर फ्लो होतं. यावर्षी जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे पर्यटक लोणावळ्यात पर्यटक गर्दी करत आहेत. दोन दिवसांपुर्वी लोणावळ्यातील भुशी धरणात पाय घसरुन एक पर्यटक वाहत गेला होता.24 तासांनंतर सुरक्षा पथकाला त्याचा मृतदेह सापडला होता. हे अपघात टाळण्यासाठी पाचनंतर बंद ठेवण्याचा निर्यण घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या आणि अपघाताच्या पार्श्वभूमीवर सिंहगड किल्ला देखील 16 जुलैपर्यंत पर्यटनासाठी बंद ठेवा अशी विनंती वनविभागाकडून जिल्हाप्रशासनाला केली जात आहे.
पुण्यासह राज्यभरात सध्या जोरदार पाऊस पडतो आहे. अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक शहरात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे शेजारच्या गावांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. मात्र नागरिकांनी देखील सावधान राहण्याची गरज आहे.
खडकवासला धरण 100 टक्के भरल्याने पुण्याच्या मुठा नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. परवाच्या (10जुलै) मध्यरात्रीपासून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात केली आहे. पावसाची जोरदार बॅटींग सुरु असल्याने पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे.