Pune-Pimpri School Closed News: पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. पुढील दोन दिवस दोन्ही शहराला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अतिमुसळधार पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  त्यामुळं आज दुपार ते उद्या सायंकाळपर्यंत शाळा भरणार नाहीत. उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती पालिका आयुक्त राजेश पाटलांनी दिली.


दोन्ही शहरातील शाळकरी मुलांना पावसामुळे आणि वाहतुक कोंडीमुळे शाळेत जाण्यात अडथळ निर्माण होत आहेत. त्यांना अनेक समस्यांना सामोरसुद्धा जावं लागत आहे. शहरात अनेक ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना देखील घडत आहे. शाळकरी मुलांची सुरक्षा लक्षात घेता शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


 मागील तीन दिवस पुणे शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. शहर आणि ग्रामीण परिसरात अति मुसळधार पाऊस पडत आहे. तीन दिवस पुण्यात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घाटमाध्यावर चांगला पाऊस झाल्याने शहराजवळील चारही धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहराच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. 


सिंहगड किल्ला बंद ठेवण्याची शक्यता
पावसाचा अंदाज आणि पायथ्यापासून सिंहगडाकडे जाणाऱ्या 9 किमीच्या मार्गाला खडक कोसळण्याच्या भितीने  पुणे वनविभागाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून सिंहगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना 16 जुलैपर्यंत बंदी घालण्याची विनंती केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र लिहिले आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी, किल्ल्याला भेट देण्यास तात्पुरती बंदी आवश्यक आहे, असं वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



लोणावळ्यात संध्याकाळी पाचनंतर प्रशासनाने पर्यटनाला बंदी घातली आहे. शहरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. त्यामुळे भुशी धरणाने रौद्र रूप धारण केलंय. त्यामुळं पर्यटकांना धरणाच्या बाजूला उभ राहून इथला आनंद घ्यावा लागत आहे. भुशी धरण इतकं ओसंडून वाहतंय की पायऱ्या ही दिसेनाशा झाल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्याला जायचा बेत आखत असाल तर काळजी घेण्याची गरज आहे.