Maharashtra Rain Update : हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सर्वदूर पावसाने हजेरी लावल्यानं पेरणी झाल्यानंतर आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पुढील पाच दिवस दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज  हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.   


मराठवाड्यात सर्वत्र पावसाची हजेरी
मागच्या 24 तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय.परभणी,नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय, उस्मानाबादमध्ये ही जोरदार पाऊस झालाय तर बीड,लातूर,औरंगाबादमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. ज्यामुळे अनेक पिकांना मात्र जीवदान मिळाले असले तरी नांदेड आणि परभणी शहराची अवस्था मात्र फार वाईट झाली होती. सतत पडत असलेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणीच पाणी झाले होते.परभणीत भीम नगर,क्रांती नगर,इंदिरा गांधी नगर,रामकृष्ण नगर मधील काही घरात पाणी शिरले तर रेल्वेस्थानक, बस स्थानक पूर्ण पाण्यात गेले होते.नांदेडमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळालीय.


Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वत्र चांगल्या पावसाचा अंदाज, विभागवार अंदाज जाणून घ्या...


उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार
काल रात्री उशीरापर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वदूर संततधार झाली. उस्मानाबाद शहरासह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.  सतत चार तासाच्या पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली गेले होते. उस्मानाबादेत नव्याने तयार करण्यात आलेल्या मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली.  बसवेश्वर चौक ते जिजाऊ चौकादरम्यानच्या अर्धवट काम असणाऱ्या पुलांवर पाणी साठले होते. बसस्थानक परिसर तसेच संजीवन हॉस्पिटल जवळ पाणी साचल्याने वाहनधारकांना मार्ग काढताना कसरत करावी लागली. ग्रामीण भागापेक्षा शहर आणि परिसरात पावसाचा जोर होता. पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


परभणी शहर आणि परिसरात 15 वर्षानंतर सर्वाधिक पावसाची नोंद


परभणी शहर आणि परिसरात तब्बल 232 मिमी पावसाची नोंद झाली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान शास्त्र विभागात या पावसाची नोंद कऱण्यात आली आहे. 2005 आणि 2006 नंतर 15 वर्षानंतर एवढा पाऊस पडला असल्याचं सांगण्यात आलंय. 24 तासात 232 मिमी पाऊस पडण्याची आजपर्यंतची तिसरी वेळ आहे. 2005 साली 242 मिमी,2006 साली 234 मिमी तर 2021 साली म्हणजे यंदा 232 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. कालच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक रस्ते अजुनही बंदच आहेत.


बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी..


पावसाळ्याच्या तोंडावर धो-धो बरसणाऱ्या पावसाने पेरणीनंतर उघडीप दिली होती. त्यामुळे बीड जिल्ह्यातील काही भागात पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. मात्र मागच्या दोन दिवसापासून बीड जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल दुपारपासून बीड जिल्ह्यात पुन्हा दमदार पावसाने सुरुवात केली आहे. बीड शहरामध्ये मध्यम स्वरूपाचा तर अंबाजोगाई तालुक्यात परळी आणि माजलगाव परिसरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.


नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस
गेल्या महिनाभर दडी मारलेल्या पावसाने कालपासून नांदेड शहरासह जिल्हाभरात दमदार हजेरी लावलीय. काल दुपारनंतर  झालेल्या जोरदार पावसामुळे नांदेड शहर मात्र जलमय झालेय.नांदेड शहरातील भाग्यनगर, आनंद नगर, तरोडा नाका, भावसारचौक ,महावीर चौक ,वाजीराबाद चौकातील सखल भागात पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शहर तुंबल्याची स्थिती निर्माण झालीय. नांदेड शहरातील ड्रेनेज व नाल्यांचे पाणी रस्त्यावर येऊन शहरातील सर्व रस्ते मात्र जलमय झालेत. परंतु पहिल्याच पावसात शहरातील रस्ते तुंबल्यामुळे नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या नाले सफाई मोहिमेचे मात्र पितळ उघडे झालेय. या मुसळधार पावसामुळे नांदेड शहरातील तरोडा नाका, गोकुळ नगर, लेबर कॉलनी परिसरातील नागरिकांच्या घरात व दुकानात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. महापालिकेने मान्सूनपूर्व नाले सफाईच्या कामात केलेला ढिसाळपणा यामुळे मात्र उघड झालाय. 


सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू


सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सतत पावसामुळं जिल्ह्यातील नद्याच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. रात्रीपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे.  पावसाचा जोर कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1323.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 


रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर पाऊस 


रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारनंतर चांगलाच पाऊस बरसत आहे. सद्यस्थितीत पावसानं जिल्ह्याच्या दक्षिण भागात काहीशी उसंत घेतली आहे. पण, उत्तर भागात मात्र पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान, मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं संगमेश्वरमधील माखजन बाजारपेठेत पाणी शिरलं आहे. बावनदी, सोनवी आणि शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे. पुढील 2 दिवस दक्षिण कोकणात अर्थात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील चांगलाच पाऊस बरसत असून नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ होत आहे. अशीच स्थिती पावसाची कायम राहिल्यास नद्यांना पुराची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, जवळपास 10 दिवसानंतर पावसाचं आगमन झाल्यानं बळीराजा मात्र सुखावला असून शेतीची कामं उरकण्याकडे त्याचा कल दिसून येत आहे. 


बुलढाणा : जिल्ह्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे.  त्यामुळे पूर्णा नदीची पातळी वाढली असून सातत्याने नदीच्या पातळीत वाढ होत आहे. रात्री तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी मात्र सुखावला आहे.


अकोला: जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत मुसळधार पावसानं सर्वच तालुक्यांत पूर परिस्थिती होती. 10 जुलैच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू होती. यामुळे जिल्ह्यातील मुख्य नदी असलेल्या काटेपुर्णा नदीसह पठार, मन, बोर्डी नदीला पूर आले होते. अकोला आणि अकोटला जोडणाऱ्या गांधीग्राम येथील पुलापर्यंत पुराचे पाणी आले होते. आता मात्र, पाणी पातळी कमी झाल्याने अकोला- अकोट मार्ग बंद पडण्याची परिस्थिती तुर्तास टळलीय. जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पुरामूळे शेतं खरडून गेली आहे. या सर्वदुर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील रखडलेल्या पेरणीच्या कामांना मात्र वेग आलाय.