Maharashtra Weather Update : राज्यातील बहुतांश भागात गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने(Rain Update) सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. दरम्यान, आज देखील राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसर पाऊस पडेल (Heavy Rain) असा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. वातावरणात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे तसेच त्याच्या प्रभावामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्र आणि लगतच्या भागात पावसाचा जोर (Heavy Rain) वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. या परतीच्या पावसाच्या सर्वाधिक फटका हे शेतातील पिकांना बसला असून ऐन कापणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान केलं आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.


चिमुकल्या विद्यार्थ्यांचा पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास


दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातही दमदार पाऊस झाल्याने सर्वत्र एकच दाणादाण उडवली आहे. या पावसाचा फटका धान पिकांना बसला असून या शेतपिकांची तात्काळ पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  दरम्यान, गोंदियाच्या बाघोली येथील नाल्याच्या पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने शाळेत जाण्याकरिता विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. गावकऱ्यांच्या मदतीने या पुलावरून चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट काढावी लागत आहे. बोरगाव, मरारटोली, सीलेगाव या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कुऱ्हाडी येथे जावं लागतं.


मात्र मधातच बाघोली या गावाच्या लगत एक नाला पडतो. नाल्यावरील पूल हा कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात नेहमी पूर चढत असतो. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आला असून विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाची मागणी प्रलंबित असून प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अजूनही पुलाची मागणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे शिक्षणासाठी जात असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत घेऊन या पुलावरून वाहत्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. 


अवकाळी पावसानं कापणीला आलेलं भातपीक जमीनदोस्त


मागील तीन दिवसात भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं हजेरी लावली आहे. भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळं शेतात डौलत असलेलं आणि कापणीला आलेलं भातपीक या पावसामुळं जमीनदोस्त झालं आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात हा चौथांदा पावसाचा जबर फटका शेतकऱ्यांना बसलाय. यामुळं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाच्या वतीनं नुकसानीचे पंचनामे करायला सुरुवात करण्यात आलेली असून आता केवळ पंचनामे नको तर, थेट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.


हे ही वाचा