पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा कालचा(गुरूवारी) होणारा पुणे दौरा रद्द (PM Modi Pune Visit) मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे रद्द करण्यात आला. मोदींच्या हस्ते काल सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भूमिगत मेट्रोचं लोकार्पण होणार होते. तर स्वारगेट ते कात्रज मेट्रोचं भूमिपूजनही होणार होते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे. 


पुणे मेट्रो प्रकल्पाच्या सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे लोकार्पण येत्या रविवारी (29 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच होणार आहे. ऑनलाईन पध्दतीने हे उद्घाटन करण्याची तयारी भारतीय जनता पक्षाने केली आहे. केंद्राच्या पातळीवर वरिष्ठ नेत्यांबरोबर काल (गुरुवारी) दिवसभर चर्चा झाल्यानंतर पुढील दोन दिवसांतच पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयाने होकार कळवला असून ऑनलाईन माध्यमातून हे उद्घाटन रविवारी 29 सप्टेंबरला होणार आहे. 


सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल, गुरुवारी होणार होते. मात्र, पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. मोदी यांचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गाचे लोकार्पण कधी होणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन देखील काल करण्यात येणार होते, मात्र आता ते 29 सप्टेंबर रोजी ऑनलाइन पध्दतीने होणार आहे. त्यामध्ये जिल्हा सिव्हिल कोर्ट  ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमिगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट - कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन केले जाणार आहे. क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाड़ा येथे पहिली मुलींची शाळा याचे भूमिपूजन करण्यात येईल. सोलापूर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.


मविआच्या कार्यकर्त्यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनाचा प्रयत्न


विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे. रविवारी २९ तारखेला लोकार्पण होणार आहे, मात्र याविरोधात मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले आहेत.


काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन सुरू झालं आहे, मोदींच्या येण्याची वाट पाहण्याची गरज नाही, सामान्यांचे पैसे आहे, त्यांचा अपव्यय होत आहे, काल मोदींनी मेट्रोचं ऑनलाईन पध्दतीने का लोकार्पण केलं नाही, असाही सवाल नेत्यांनी उपस्थित केला आहे. जोवर मेट्रो सुरू होत नाही, तोवर आम्ही इकडून हलणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे, आंदोलक संतप्त झाले आहेत.