मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election 2024) आता विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) वारे वाहू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला (Mahayuti) राज्यात मोठा फटका बसल्यानंतर आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीय केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी महाराष्ट्रात बैठकांचा धडाका लावला आहे. नुकताच अमित शाह यांनी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दौरा केला. यानंतर आता अमित शाहांच्या टार्गेटवर मुंबई (Mumbai) असल्याची माहिती मिळत आहे. 


विधानसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात अमित शाहांनी निवडणुकीची रणनिती मांडताना आपल्याला शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना रोखायचे आहे, अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच आपल्याला उद्धव ठाकरे, शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे, असेही त्यांनी म्हटले. यानंतर आता अमित शाह यांनी मुंबईवर टार्गेट केले आहे. 


मुंबईत भाजपचे पदाधिकारी अलर्ट मोडवर


मुंबईसाठी अमित शाह विशेष प्लॅनिंग करत आहेत. अमित शाह स्वतः मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारासंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत. तसेच ते मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद देखील साधणार आहेत. अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर आल्याचे दिसून येते. पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे. हा रिपोर्ट अमित शाह यांच्याकडे सादर केला जाणार आहे. यामुळे ज्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचे टेन्शन वाढणार असल्याचे बोलले जात आहे.


अमित शाहांचा भाजपला कानमंत्र 


दरम्यान, मविआला रोखायचं असेल तर अमित शाहांनी महाराष्ट्र भाजपला एक कानमंत्र दिला आहे. महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मूळ कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा, असे त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.


शिवसेनेकडून 'महाविजय संवाद' यात्रा 


तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना युवा सेनेकडून 'महाविजय संवाद' यात्रेला आज पासून सुरूवात आहे. या यात्रेच्या माध्यमातून युवा सेनेचे पदाधिकारी युवा महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तरूणांशी संवाद साधणार आहेत. महाविजय संवाद यात्रेचा टिझर रिलिज करण्यात आला आहे. तसेच शिवसेना सोशल आवाजच्या माध्यमातून कॅम्पेनिंग करत लाडकी बहीण संपर्क अभियान राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निर्देशानुसार युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वात महाविजय संवाद यात्रा काढली जाणार आहे. 27 सप्टेंबरपासून या यात्रेला सुरूवात होणार असून मुंबई शहर व उपनगर पहिल्या टप्यात ही यात्रा होणार आहे. तर 13 ऑक्टोबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यात युवासेनेतर्फे ही यात्रा काढली जाणार असून २० ऑक्टोबर ते 22 ऑक्टोबर दरम्यान कोकणमध्ये यात्रा केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात जाऊन शासनाने घेतलेल्या निर्णयांचा प्रसार आणि प्रचार या यात्रेतून केला जाणार आहे. 


आणखी वाचा 


Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?