Maharashtra Rain Update : गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) बहुतांश जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आजपासून पुढील पाच दिवस देखील विदर्भात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. तर मागील दोन दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार ते तिसऱ्यांदा पेरण्या करण्याचे संकट ओढवले आहे.  


ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या शेतांना अक्षरक्ष: तलावांचे स्वरूप 


अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात नालवाडा, चिपरडा, बेलोरा आणि मोचरडा येथे काल सतत दोन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. ढगफुटी सदृश्य पावसाने शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतांना अक्षरक्ष: तलावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. परिणामी, शेतकर्‍यांच्या शेती पाण्याने तुडुंब भरल्याने सगळीकडे जलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेकांचे पीक खरडून गेली असून यात अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून हवालदिल झालेला आहे. तर दुसरीकडे या पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकर्‍यांवर दुबार तर कोणावर तिबार पेरणी करण्याची वेळ आलेली आहे.  मात्र दुबार, तिबार पेरणीच्या खर्चामुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. दर्यापूर तालुक्यात अनेक ठिकाणी असे नुकसान झालेले आहे. नालवाडासह आजूबाजूच्या गावात ढगफुटी सदृश्य पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.  


नाल्याच्या पुराचे पाणी शिरले घरात, तर गुरुवारपर्यंत यलो अलर्ट  


यवतमाळ जिल्ह्यात काल दुपारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यात जोरदार बरसलेल्या पावसाने दारव्हा तालुक्यातील चाणी कामठवाडा गावालागत असलेल्या खंड्याच्या नाल्याला पूर आला असल्याने नाल्याचे पाणी अनेकांच्या घरात शिरले आहे. या पावसाचा फटका अनेक घरांना फटका बसलाय. तसेच जिल्ह्यातील अनेक भागात पुराचे पाणी शिरल्याने शेतशिवाराचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, दारव्हा, कळंब, बाभूळगाव, आर्णी, पुसद या तालुक्यांमध्ये मोठ्या स्वरूपात पाऊस बरसला. तर नाल्याकाठच्या शेतशिवारात पुराचे पाणी आत शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हवामान विभागाने यवतमाळ जिल्ह्याला आज रेड अलर्ट, तर गुरुवार पर्यंत येलो अलर्टचा इशारा दिला आहे.


बेंबळा प्रकल्पातून 86 क्यूसेक पाण्याचा विसर्ग 


यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेल्या बेंबळा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झालीय. बेंबळा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या जलाशय पातळीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे दोन दरवाजे 50 सेंटिमटरने उघडन्यात आले असून यातून 86 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग होते असल्याने बाभुळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, वणी या तालुक्यातील नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.


 मुसळधार पावसाची दाणादाण!


वाशिम जिल्ह्यात काल दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने  नदी-नाले प्रवाहित झाले. दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असून पिकांना संजीवनी मिळाली आहे. सततच्या पावसामुळे एरंडा जवळील पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे या पुलाच्या दोन्ही बाजूने वाहनांची रांग लागली होती. तर शेतात कामाला गेलेल्या महिला या पुलाच्या एका बाजुला अडकल्या होत्या. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सायंकाळी वाहतूक पूर्ववत झाली. या पुरामुळे सायंकाळपर्यंत वाशिम ते किन्हीराजा या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. तर कीनखेडा, एरंडा ,गुंज, कारली,  बोराळा, तोरणाळा, या भागात मुसळधार पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतीच नुकसान झालं असून  काही काळ जनजीवन विस्कळीत झालं होतं. संध्याकाळ पासून उघडीप दिली असून  आज नुकसान झालेल्या भागात पंचनामे  केल्या जाणार आहेत.


हे ही वाचा